Vidhan Sabha 2019 : राज्यभरात प्रचाराचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

विजयादशमीनंतर विधानसभा निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांच्या प्रचार सभेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राहुल यांना पराभव मान्य - फडणवीस
शिरपूर/शहादा - ‘निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीचे पैलवान दंड थोपटत आहेत; पण समोरून लढायलाच कोणी नाही. काँग्रेसचे राहुल गांधी निवडणुकीपूर्वी पराभव मान्य करून बॅंकॉकला निघून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ‘आधे इधर जाव, आधे उधर जाव, बाकी मेरे पिछे आव’ अशी आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीची खिल्ली उडवली.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नेर आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे त्यांच्या सभा झाल्या. शिरपूर येथील युतीचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. या सभेत माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी अध्यक्षा संगीता देसले, राजेंद्र देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फडणवीस म्हणाले, की आघाडीचा जाहीरनामा त्यांची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे. सत्ता येणार नाही हे उमगल्याने अशक्‍यप्राय आश्वासने त्यांनी दिली आहेत. प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ असे आश्वासन द्यायचेच शिल्लक ठेवले आहे. पाच वर्षांत शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांची मदत दिली.

सर्व उपसा योजना पाच वर्षांत
शहादा - शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या पंधरा वर्षांत पाणी गेले नाही. आघाडीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला. पाच वर्षांत तापी काठावरील बॅरेजेसच्या माध्यमातून उपसा सिंचन योजना सुरू करतोय. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल, ते सुजलाम्‌- सुफलाम्‌ होतील. नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील दहा टीएमसी पाणी याच मतदारसंघासाठी आणले जाईल , असे फडणवीस यांनी सांगितले. 

हे सरकार कुणासाठी चालवता? - शरद पवार 
वाडेगाव/अकोला - ‘शेतकऱ्यांपासून उद्योगांपर्यंत सर्वंच अडचणीत असतील; तर हे युती सरकार कुणासाठी चालवता,’’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे सभेत केला.

‘राजकारणासाठी लष्कराच्या शौर्याचा वापर करून सत्तेवर आलेले हे सरकार आहे. यापूर्वी काँग्रेसच्या काळात पाकिस्तानविरुद्धची युद्धे जिंकली. इंदिरा गांधी यांच्या काळात तर केवळ युद्ध जिंकून इतिहासच रचला नाही, तर त्यांनी पाकिस्तानची फाळणी करून जगाचा भूगोलही बदला. त्याचा कधीही काँग्रेसने मते मिळविण्यासाठी वापर केला नाही. कर्जमाफी केली. पण, आतापर्यंत ३१ टक्केच शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. ६९ टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. मी केंद्रात कृषिमंत्री असताना यवतमाळ येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिल्लीतून येऊन मी थेट त्या गावात गेलो. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची व्यथा ऐकून तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली आणि त्यांनी कर्जमाफी करण्याची परवानगी दिली आणि थेट ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज सरसकट माफ केले,’’ असे पवार म्हणाले. 

मैं तो अभी जवान हूँ!
‘राजकारणात नवी पिढी आणण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे सर्वाधिक युवा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहेत. मी ८०व्या वर्षी प्रचारासाठी राज्यभर फिरतो आहे. या वयातही मी राजकारण करीत असल्याचे लोक म्हणतात. पण, मी काय म्हातारा झालो आहे? मैं तो अभी जवान हूँ... दोन-चार लोकांना घरी पाठवूनच मी जाईन,’’ असे शरद पवार यांनी सांगितले.

नशिबी आल्याने पवारांना बेरोजगारी कळली - उद्धव 
संगमनेर - ‘राज्यात साठ वर्षांत बेरोजगारांचे तांडे वाढले. शरद पवार यांच्या नशिबी आता बेरोजगारी आल्याने त्यांना ती कळली,’’ अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. ‘दोन्ही काँग्रेस थकल्या असून, आता एकत्र येण्याची गरज आहे,’ या सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर, ‘ते खाऊन खाऊन थकले असतील,’ असा चिमटा काढून, ‘‘तुम्ही एकत्र येणार आहात; पण तुमचा नेता कोण आहे?’’ अशी विचारणा ठाकरे यांनी केली.

संगमनेर येथे झालेल्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांचे थेट नाव घेऊन ठाकरे यांनी टीका केली. निझर्णेश्वर येथे थोरातांनी स्वतःला बाजीप्रभूंची उपमा दिल्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ‘‘बाजीप्रभू म्हणजे कोण, हे तरी माहीत आहे का? कुठे छत्रपती? कुठे बाजीप्रभू आणि कुठे हे? येथे लोक तुम्हाला साखरचोर म्हणतात. बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी खिंड लढवली. स्वतःला बाजीप्रभू म्हणवणारे थोरात खुर्चीसाठी लढताहेत. तुमचा नेता बॅंकॉकला पोचला. तुम्ही निश्‍चिंतपणे घरी बसा. नाही तरी जनता तुम्हाला घरी बसवणारच आहे.’

खेचाखेची करू नका
जागावाटपावरून नाराज झालेल्या शिवसैनिकांची समजूत काढताना, ‘चांगले सरकार आणण्यासाठी आपण सोबत आहोत. खेचाखेची करू नका,’ अशी विनंती ठाकरे यांनी केली. आघाडीचे निखारे आता इकडे आले आहेत, असे सांगत ते म्हणाले, ‘‘युतीची ताकद वाढल्यामुळे निश्‍चित परिवर्तन होणार आहे. या मतदारसंघात युतीचे प्रतिबिंब दिसण्यासाठी प्रथम पाणी आणण्याची आवश्‍यकता आहे.’’ 

युती टिकवण्याकडे लक्ष द्या - अजित पवार 
पुणे - राज्यात पाच वर्षे सत्ता भोगलेल्या शिवसेनेला शेतकरी, महागाई, बेरोजगारीबाबत काहीच करता आले नाही. आता कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन देणारे शिवसेना नेतृत्व पाच वर्षे झोपा काढत होते का, असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘माझ्या अश्रूंबाबत बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी युती टिकवण्याकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार यांनी पक्षकार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. या वेळी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. भाजप, शिवसेना सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करीत पवार यांनी युतीच्या अजेंड्यावरच बोट ठेवले. ते म्हणाले, ‘‘राज्यात शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्याऐवजी सरकारने केवळ तोंडदेखलेपणा केला. शेतकरी आत्महत्या वाढल्या. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. परंतु, उद्योग वाढविण्याच्या नावाखाली केवळ योजनांची घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना पीकविमा का मिळाला नाही, असा सवालही त्यांनी केला.

आघाडीला १७५ जागा मिळतील
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्रपक्ष आघाडीला २८८ पैकी १७५ जागांवर यश मिळेल, असा दावा पवार यांनी मेळाव्यात केला. युतीतील वाद, तिकीटवाटपातील गोंधळ व त्यांची पक्षांतर्गत नाराजी आघाडीच्या पथ्यावर पडणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडणुकीच्या तोंडावर झालेले पक्षांतर, आघाडीचे जागावाटप, जाहीरनामा या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Political Party Promotion Politics