Vidhansabha 2019 : राज्यात युतीची वाट बिकट

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

मुंबई - महाजनादेश यात्रेची नाशिक येथे सांगता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप- शिवसेना युती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. यामुळे भाजप- शिवसेना युतीची वाट बिकट असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर शिवसेनेकडे दुर्लक्ष करून जागावाटपात कमी महत्त्व देणे ही रणनीतीदेखील भाजपने आखल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गेले दीड महिना महाजनादेश यात्रा काढून राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवला होता. या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान मोदी यांनी केला. मोदी त्यांच्या भाषणात भाजप- शिवसेनेबाबत काहीतरी बोलतील, युती होण्याच्या दिशेने काही सूतोवाच करतील, अशी अटकळ बांधली जात असताना मोदी यांनी याबाबत अवाक्षरही काढले नाही. उलट मोदी यांनी राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे यावर उलटसुलट टिप्पणी का करता, असा सवाल केला. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभे राहावे, यासाठी उत्तर प्रदेशची वारी केली होती. मोदी यांनी अप्रत्यक्षरीत्या उद्धव यांच्यावर टीका केल्याचे बोलले जाते. मुंबई येथील आरे प्रकल्पातील कारशेडला शिवसेनेचा असणारा विरोध आणि अलीकडेच कोकणात महाजनादेश यात्रेत नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले वक्‍तव्य हे सर्व युतीत अद्याप अडथळे असल्याचे निदर्शक मानले जात आहेत. 

मित्रपक्षाला दिल्या जाणाऱ्या जागा गृहीत धरून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे भाजपचे गणित आहे, तर २८८ पैकी १४४ जागांवर हक्‍क सांगत शिवसेना आपला दावा रेटत आहे. मात्र हा दावा भाजपला मान्य नाही. परिणामी भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन शिवसेनेला १०० ते ११० च्या आसपास जागा देण्याच्या बेतात आहे. यामुळे जागावाटपावरून युतीचे फाटले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली असताना, पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणात युतीबाबत एक चकार शब्दही काढला गेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com