महाराष्ट्राला देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य करणार - मुख्यमंत्री 

महाराष्ट्राला देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य करणार - मुख्यमंत्री 

मुंबई - महाराष्ट्रात आतापर्यंत चार लाख शौचालये उभारण्यात आली आहेत. आतापर्यंत 250 पैकी 200 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व शहरे व गावे हागणदारीमुक्त करून, या वर्षीच महाराष्ट्र हे देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य करण्यात येईल. त्यासाठी आवश्‍यक तो निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगर परिषदा, सर्वोत्कृष्ट नगर परिषदा तसेच महापालिकांना विशेष पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ""राज्यात वेगाने नागरीकरण होत असताना त्याला नियोजनबद्ध स्वरूप दिले गेले नाही. पिण्याचे पाणी, कचऱ्याची समस्या, सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष दिले गेले नाही. राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांपासून गावांबरोबरच शहरांच्या सुनियोजित विकासावर लक्ष केंद्रित केले. या कालावधीत राज्याने शहरांसाठी 21 हजार कोटी रुपये दिले आहेत. शहरांच्या शाश्वत विकासासाठी सर्वप्रथम सांडपाण्याचा निचरा, घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, वर्गीकरणावर भर देणे गरजेचे आहे. हागणदारीमुक्तीअंतर्गत राहिलेल्या पन्नास शहरांसह 120 नगर पंचायतींही हागणदारीमुक्त करावयाच्या आहेत. हे अभियान "मिशन मोड'वर चालवून या वर्षीच महाराष्ट्र हे देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य करावयाचे आहे. एक मे 2017 ते एक मे 2018 या कालावधीत यावर विशेष लक्ष दिले जाणार असून, घनकचरा वर्गीकरण व विलगीकरणामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शहरांना पारितोषिक देण्यात येईल. शहरांचे विविध 146 प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.'' 

कार्यक्रमात उत्कृष्ट अ वर्ग नगर परिषदांना प्रत्येकी चार कोटी रुपयांचा पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले. उत्कृष्ट ब वर्ग नगर परिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तीन कोटी रुपयांचा, तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि उत्कृष्ट क वर्ग नगर परिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा, तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र, असे पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. 

विभाग आणि पुरस्कारार्थी नगरपरिषदा 
- "अ' वर्ग नगर परिषद : नागपूर व अमरावती विभाग : वर्धा 
नाशिक व औरंगाबाद विभाग : उस्मानाबाद 
कोकण व पुणे विभाग : अंबरनाथ 

- ब वर्ग नगर परिषद : 
विभाग प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक 
पुणे --------------- पंढरपूर विटा 
नागपूर ----- उमरेड बल्लारपूर 
अमरावती ------- वाशीम उमरखेड 
औरंगाबाद -------- हिंगोली वैजापूर 
नाशिक ---------- शिरपूर वरवाडे संगमनेर 
कोकण ----------- खोपोली रत्नागिरी आणि चिपळूण (विभागून) 

"क' वर्ग नगर परिषद 
पुणे --------------- पाचगणी आष्टा 
नागपूर ------------ मौदा नगर पंचायत खापा 
अमरावती ---------- शेंदूरजनघाट दारव्हा आणि पांढरकवडा (विभागून) 
औरंगाबाद ---------- तुळजापूर पाथरी 
नाशिक ---- -------- त्र्यंबक देवळाली प्रवरा 
कोकण ------------- वेंगुर्ला मालवण 

सर्वोत्कृष्ट नगर परिषदा  
"अ' वर्ग : अंबरनाथ (जि. ठाणे) 
"ब' वर्ग : उमरेड (जि. नागपूर) आणि शिरपूर वरवाडे 
"क' वर्ग : वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) 

विविध विभागांत उत्कृष्ट काम केलेल्या महापालिका  
महापालिका ------------ विशेष कामगिरी 
पुणे ------------------- हागणदारीमुक्ती कार्यक्रमात अत्युत्कृष्ट काम 
नवी मुंबई -------------- सर्वाधिक वसुली व कचरा वर्गीकरण 
ठाणे -------------------- सर्वाधिक वसुली 
धुळे ------------------- सर्वाधिक वसुली 
अकोला ---------------- उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न 
मीरा-भाईंदर ------------ प्रकल्प व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम काम 
नागपूर ----------------- प्रकल्प व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम काम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com