esakal | दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

SSC Result 2021 : दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची आलेली माहिती एकत्रित करून अंतिम निकाल तयार करण्यासाठी विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल तयार केले जातील. साधारणत: येत्या काही दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. (Maharasthra state board SSC result process in final stage aau85)

हेही वाचा: NEET 2021 Exam Date: सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा; वाचा कसा कराल अर्ज?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरण्याचे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात परीक्षेसाठी अर्ज केलेल्या एकूण १६ लाख चार हजार ४४१ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १५ लाख ९२ हजार ४१८ हून अधिक विद्यार्थ्यांची गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शाळांना उर्वरित विद्यार्थ्यांचे गुण, त्यातील दुरुस्त्या करण्यासाठी ९ जुलैपर्यंतची मुदत होती. शाळांकडून करण्यात आलेल्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विभागीय मंडळामार्फत एकत्रित करण्याची प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर अंतिम निकाल तयार करण्यासाठी राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. येत्या आठवड्यात हे कामकाज पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरवातीला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: आमदार नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी भूमिका स्पष्ट करावी - राज्य सरकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आणि संगणक प्रणालीची व्यवस्था शाळांना उपलब्ध करून देण्यात आली. परंतु शाळांना काही विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. मात्र, राज्य मंडळाकडून या अडचणी सोडवल्या जात आहेत. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा निकाल सुद्धा लवकर तयार होण्यास मदत होणार आहे.

अंतर्गत मूल्यमापनाच्या संगणकीकरणाचं काम ९९ टक्के पूर्ण

याप्रकरणी अधिक माहिती देताना मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, म्हणाले, ‘‘दहावीचा निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाची माहिती संगणक प्रणालीत भरण्याचे कामकाज ९९ टक्के पूर्ण आहे. दरम्यान काही शाळांना विद्यार्थ्यांचे गुण भरताना अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये माहिती भरली परंतु निश्चित न करणे, लॉगिन पासवर्डमध्ये समस्या येणे, सवलतीचे गुण देताना गोंधळ होणे, असा समस्यांना तोंड द्यावे लागले. आता शाळांनी संगणक प्रणालीत विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकालाची माहिती अपलोड केली असून ती विभागीय मंडळाकडे पाठविली आहे.’’

या गुणांआधारे अंतिम निकाल तयार होणार

तर पुणे विभागीय मंडळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे म्हणाले, ‘‘शाळांमार्फत दहावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाची विभागीय मंडळाकडे पाठविलेली गुण एकत्रित केले जातील. त्यानंतर हे गुण अंतिम निकाल तयारी करण्यासाठी राज्य मंडळाकडे पाठविण्यात येतील. या गुणांच्या आधारे राज्य मंडळामार्फत अंतिम निकाल तयार करण्यात येईल.’’

loading image