Mahavikas Aghadi : आघाडीत एकवाक्यता! जागांचे सूत्र जाहीर

‘महाविकास आघाडीमध्ये सर्वसहमतीने निर्णय घेण्यात आलेले आहेत. ४८ पैकी एकाही जागेबाबत मतभिन्नता नाही. सर्वांमध्ये एकवाक्यता आहे,’
Mahavikas aghadi
Mahavikas aghadisakal

मुंबई - ‘महाविकास आघाडीमध्ये सर्वसहमतीने निर्णय घेण्यात आलेले आहेत. ४८ पैकी एकाही जागेबाबत मतभिन्नता नाही. सर्वांमध्ये एकवाक्यता आहे,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याची ग्वाही दिली.

तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, सर्व इच्छा-महत्वाकांक्षा बाजूला ठेवून केवळ जिंकण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवून महाविकास आघाडी मैदानात उतरली असल्याची घोषणा केली. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठे मन करून  कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केले. यावेळी जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले.

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आज शिवालय येथे पार पडली. या परिषदेला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्याबरोबरच ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र  पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख उपस्थित होते. 

यावेळी आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यात आले. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वांत मोठा पक्ष ठरला असून हा पक्ष २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस १० जागी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. या जागावाटपाच्या घोषणेनंतर या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी जागावाटपाची चर्चा आणि महाविकास आघाडीतील समन्वय यांची माहिती दिली. ठाकरे म्हणाले, ‘आघाडीत शक्य असेल तोपर्यंत चर्चा होत असतात. आघाडीतील प्रत्येक घटकाचा तो अधिकार आहे. मात्र, एक क्षण असा येतो की, एकमेकांना समजून घेत जागावाटप जाहीर करत प्रत्यक्ष निवडणुकीसाठी सज्ज व्हावे लागते. आता तो क्षण आला आहे. सर्वांच्या मनातील शंकांना या पत्रकार परिषदेतून उत्तरे मिळाली असतील.

प्रत्येक जागेवर लढण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक पक्षाची असते. मात्र, जिंकण्याचे मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणाला सर्व इच्छा आणि महत्त्वाकांक्षांना आवर घालावा लागतो. आपण कशासाठी, कोणासाठी आणि कोणाविरोधात लढत आहोत, ते लक्षात घेत निर्णय घेऊन मैदानात उतरावे लागते आणि जिंकावे लागते. आता कोणाच्याही मनात काहीही प्रश्न किंवा शंका नाहीत.

शिवसेनेने सर्व २१ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे उमेदवार एक, दोन दिवसांत जाहीर करतील. विजयासाठी महाविकास आघाडी तयारीला लागली आहे, मात्र  आम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. आता जनतेनेच ठरवले आहे, ‘अब की बार, भाजप तडीपार’ आणि जनता हे करून दाखवणार आहे.’

महाविकास आघाडी जास्तीतजास्त व्यापक करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आघाडीतील इतर घटक पक्षांनी एकही जागा न मागता संविधान रक्षणासाठी सुरू असलेल्या आमच्या लढ्यात ते सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही आमच्यासोबत यावे, अशी आमची भूमिका होती. त्यांना काही जागा देऊ केल्या होत्या.

मात्र, ते होऊ शकले नाही. तसेच प्रकाश आंबेडकर आमच्याबाबत काहीही म्हणाले तरी आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार नाही, अशी भूमिका आपण घेतली होती. त्यांच्याबाबत आजही आम्हाला प्रेम आणि आदर आहे. संविधान रक्षणासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका घ्यावी, असे आम्हाला वाटते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पवार, ठाकरेंचा मोदींवर घणाघात

पंतप्रधानपद हे घटनात्मक पद आहे. त्याची सर्वाधिक मानहानी नरेंद्र मोदी यांनी केली असल्याची टीका शरद पवार यांनी केली. तर भाजप हा भ्रष्ट, भेकड व भाकड जनता पक्ष असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चंद्रपूरच्या सभेत महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

ठाकरे म्हणाले, ‘काल (सोमवारी) अमावस्या, सूर्यग्रहण आणि मोदी यांची सभा असा विचित्र योग होता. ते भाषण पंतप्रधान पदावरील व्यक्तीचे नव्हते. तर, ज्या पक्षाला शिवसेनाप्रमुख कमळाबाई म्हणायचे, त्या भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी यांचे भाषण होते.’

ते म्हणाले, ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा, असे त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या व्यक्तीने येथे येऊन, येथील जनतेला असली शिवसेना, नकली शिवसेना याबाबत सांगावे हा कहर झाला. अमित शहा यांनी २०१९ मध्ये ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घेतले होते. त्यावेळीही मीच पक्षप्रमुख होतो. आमची हीच शिवसेना होती. याचा त्यांना विसर पडला आहे.

काँग्रेसने देशासाठी चांगला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास, त्याची अंमलबाजावणी केली जाईल. तसेच राज्यासाठी वेगळे मुद्दे असल्यास आणि आवश्यकता असल्यास आघाडीचा जाहीरनामा आणला जाईल, असेही ठाकरे म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, की भाजपचे तानाशाही सरकार शेतकरी, तरुण, गरीब यांना संपवून मूठभर उद्योगपतींसाठी काम करत आहे. भाजपचे पानिपत करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने घेतला आहे. फडणवीस नाही तर इंडिया आघाडी विजयाची गुढी उभारेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांगलीबाबत कुठलाही वाद नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

सातारा, माढा, रावेरबाबत दोन दिवसांत घोषणा

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. यातील सात जागांचे उमेदवार निश्चित झाले असून, उर्वरित तीन जागांवरचे उमेदवार दोन दिवसांत घोषित केले जातील, अशी माहिती शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

‘राष्ट्रवादी’कडील उमेदवारीचा तिढा कायम असलेल्या मतदारसंघांत रावेर, माढा आणि सातारा मतदारसंघांचा समावेश आहे. साताऱ्यातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांनी प्रचाराची सुरुवातही केली आहे. त्यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे समजते. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

तसेच रामराजे निंबाळकरांचे भाऊ संजीवराजे निंबाळकर यांनाही उमेदवारी मिळावी, अशी मागणी आहे. तर रावेर मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचे नाव पुढे आले आहे. या तिन्ही मतदारसंघांत नेमक्या कोणत्या नावावर राष्ट्रवादी शिक्कामोर्तब करणार, हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

जागा वाटपाचे सूत्र

  • २१ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • १७ - काँग्रेस

  • १० - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com