Mahayuti : जागावाटप घोळावर ‘महाशक्ती’ नाराज

महायुतीतील घटक पक्षांचे छोटेमोठे नेते एकेका लोकसभा मतदासंघाबाबत जाहीरपणे दररोज दावे करत असल्याने भाजपचे नेते अचंबित झाले आहेत.
mahayuti maharastra
mahayuti maharastra sakal

मुंबई - महायुतीतील घटक पक्षांचे छोटेमोठे नेते एकेका लोकसभा मतदासंघाबाबत जाहीरपणे दररोज दावे करत असल्याने भाजपचे नेते अचंबित झाले आहेत. ‘महाशक्ती’च्या छत्रछायेखाली यायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांसाठी आग्रह धरायचा आणि प्रत्यक्षात युतीधर्म न पाऴता भाजपच्या महत्वाच्या नेत्याने घोषित केलेली उमेदवारीही अजून आमच्या पक्षाने कुठे घोषित केली आहे, असा प्रश्न करणे हा अनाकलनीय प्रकार असल्याचे मत दिल्ली मुख्यालयाने घटक पक्षांना कळवले आहे. एकूणच राज्यातील जागावाटपाच्या घोळावर महाशक्ती म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याचे समजते.

मुंबई व कोकणाभोवतालच्या सहा जागा योग्य त्यावेळी जाहीर करण्याचे ठरले आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा घोषित केल्यानंतर मराठी मते कशी वळतील याचा अदमास घेत उमेदवार घोषित करणे ही रणनीती सर्व संबंधितांनी समजून घेतली पाहिजे. सार्वजनिक मंचावर कोणतेही विधान करण्यापूर्वी युतीची शिस्त समजून घेतली पाहिजे, असे भाजपचे मत आहे.

तमिळनाडू, केरळसारख्या आव्हानात्मक, एवढेच नव्हे तर बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या राज्यातील मित्रपक्षांनीही कुठल्याही जागेबद्दलची अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली नव्हती. महाराष्ट्रात मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार सुरु असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

राज्याच्या प्रत्येक भागात सहकारी पक्षांना संधी देण्याची मागणी भाजपने मान्य केली आहे. कोकणातील रत्नागिरीची जागा केंद्रीय मंत्री नारायण राणेंसारखा उमेदवार तयार असला तरी शिवसेनेचा (शिंदे गट) आग्रह विचारात घेतला जातो आहे. सातारा देऊ पण नाशिकही हवे, हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा (अजित पवार) हट्टही दुर्लक्षलेला नाही.

मात्र समजून घेण्याचा अर्थ म्हणजे सार्वजनिक विधाने करणे आहे काय, हे या मित्रांना तुम्हीच विचारा, असे महाराष्ट्रातील नेत्यांना कळवण्यात येणार आहे. मुंबईतील चार जागांचे गणित हे विधानसभा आणि महापालिका निवडणुका लक्षात घेऊन सोडवले जाणार आहे, असेही भाजपच्या एका नेत्याने सांगितले. कल्याणच्या भाजप पदाधिकार्यांचा विरोध शमवून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

आता ठाणे, पालघरबाबत भाजपचे मतही विचारात घ्यायला हवे ना? असेही हा पदाधिकारी म्हणाला. शिवसेनेने (शिंदे) आमच्या नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून जे खासदार, आमदार आले त्यांच्या भावना आम्ही विचारात न घेणे कसे जमेल, असा प्रश्न करत ठाणे आमचेच, असेही नमूद केले.

नड्डा यांच्या चमूने दिल्या सूचना

विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार या भाषण स्वातंत्र्यामुळे महायुतीत एकजिनसीपणा नाही, असा संदेश जनतेत जात असल्याचे वरिष्ठ स्तरावरून कळवण्यात आले आहे. जागांवरील दाव्यांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी पक्ष मुख्यालयाने सविस्तर संवाद साधल्याचेही समजते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या चमूने या घोळामुळे नुकसान होवू नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पाठवल्या असल्याचे समजते. प्रत्येक जागेसाठी आडमार्गाने सुरु ठेवलेला आग्रह आता भाजपसमोरची समस्या ठरतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com