मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपींच्या जामिनाला विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - मालेगावात 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या बॉंबस्फोट पीडिताने 2006 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील आरोपींच्या जामिनालाही विरोध करणारा मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. 

मुंबई - मालेगावात 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या बॉंबस्फोट पीडिताने 2006 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट खटल्यातील आरोपींच्या जामिनालाही विरोध करणारा मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. 

मालेगावात 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जखमी झाले होते. त्यापूर्वी 8 सप्टेंबर 2006मध्ये शब्बे ए बारातच्या दिवशी मालेगावमधील बडा कबरस्थान, हमिदिया मशीद आणि मुहावरत चौकात झालेल्या बॉंबस्फोटांत 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर 312 जण जखमी झाले होते. या प्रकरणी शफीक अहमद मोहम्मद सलीम यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज केला आहे. या बॉंबस्फोटात त्यांच्या 18 वर्षांच्या साजिद नावाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. 

गुन्हे अन्वेषण विभागाने प्राथमिक तपास केल्यानंतर या बॉंबस्फोटप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर 23 ऑक्‍टोबरला हे प्रकरण दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आले होते. या प्रकरणी नरुल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, शेख मोहम्मद अली, असिफखान बशीर खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद, डॉ. सलीम फार्सी, डॉ. दरोगा इक्‍बाल या नऊ आरोपींना "मोका'ही लावण्यात आला होता. हैदराबाद येथील मक्का मशीद बॉंबस्फोटप्रकरणी स्वामी असिमानंद यांनी दिलेल्या कबुलीजबाबानुसार मालेगावमधील 2006च्या बॉंबस्फोटांत हिंदू संघटनांचा सहभाग होता. त्यानुसार हे प्रकरण 2011 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आले होते. 

रामचंद्र कलसंग्रा आणि संदीप डांगे यांचा 2006मधील बॉंबस्फोटांमागे या दोघांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यापूर्वी अटक केलेल्या अन्य आरोपींना आरोपमुक्त करण्यात आले होते, तर चार जणांविरोधातील खटला अजून सुरू व्हायचा आहे. या चौघांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने, त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात मध्यस्थी करण्याची विनंती शफीक अहमद मोहम्मद सलीम यांनी केली आहे. 

Web Title: Malegaon blast accused bail opposed