कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला 16 जुलै रोजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबई: मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आता 16 जुलै रोजी होणार आहे. या याचिकेवर आज (शुक्रवार) अंतिम निर्णय येण्याची शक्यता होती, पण मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय 16 जुलैपर्यंत राखून ठेवला आहे.

मुंबई: मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आता 16 जुलै रोजी होणार आहे. या याचिकेवर आज (शुक्रवार) अंतिम निर्णय येण्याची शक्यता होती, पण मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय 16 जुलैपर्यंत राखून ठेवला आहे.

मालेगावमधील बॉम्बस्फोटांप्रकरणी 10 वर्षांपूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक झाली होती. ऑगस्ट 2017 मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कर्नल पुरोहित यांच्यावतीने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आपल्याला दोषमुक्त करावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच यापूर्वी त्यांनी केलेल्या आणि उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेल्या सर्व निर्णयांना आव्हान देण्याची मागणीही पुरोहित याने याचिकेद्वारे केली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्याने, आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही, असे सांगत आरोपमुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

कर्नल पुरोहित यांच्याविरोधात खटला चालवण्यास सरकारने दिलेल्या मंजुरीचा निर्णय रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. त्यानंतर खटल्यातून दोषमुक्त करण्याची त्यांची मागणी विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने फेटाळून लावली होती. 'मोक्का'अंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप विशेष न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित यांनी ही मागणी केली होती. या दोन्ही निर्णयांविरोधात पुरोहित यांनी नव्याने याचिका केली आहे. त्यांच्या याचिकेवर हायकोर्ट शुक्रवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.

कर्नल पुरोहित यांचे म्हणणे काय?
माझ्यावर आरोप ठेवण्यापूर्वी एनआयएने लष्कराची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे माझ्यावर हा खटलाच दाखल करता येत नाही, असा दावा कर्नल पुरोहित यांनी केला आहे. तर पुरोहित यांच्या दाव्यावर ‘एनआयए’ने आक्षेप घेतला आहे.

पुरोहित जामीनावर बाहेर
मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला. सर्वोच्च न्यायालयाने 9 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहित यांना 21 ऑगस्ट 2017 रोजी जामीन मंजूर केला आहे.

कर्नल प्रसाद पुरोहित कोण आहेत ?
2008 च्या मालेगाव स्फोटानंतर देशभरातलं सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित. एटीएसने पुरोहितांना अटक केल्यानंतर तब्बल 9 वर्ष त्यांनी कारागृहात घालवली. सर्वोच्च न्यायालयाने 21 ऑगस्ट 2017 रोजी त्यांना जामीन मंजूर केला.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका दुचाकीमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रटल्याच्या आरोपाखआली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. या स्फोटात 7 जणांचा जीव गेला होता. तर 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर हिंदुत्ववादी संघटना एटीएसच्या रडारवर आल्या. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहितांसह 10 जणांना अटक करण्यात आली. केंद्रीय गृहखात्याने 2011 च्या सुरुवातीला तपास एनआयएकडे सोपवला. 4 हजार पानी आरोपपत्र दाखल झालं. पण 9 वर्षात एकाही आरोपाची निश्चिती झाली नाही. याआधी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा जामीन हायकोर्टानेही फेटाळला होता. त्याला पुरोहितांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Web Title: malegaon blast case bombay high court to give judgement on lt col prasad purohits petition