ऐका हो ऐका! राज्यात तब्बल १,७०० बिबटे तर देशात १२ हजार ८५२

As many as 1700 leopard in the state
As many as 1700 leopard in the state

नागपूर ः भारतात १२ हजार ८५२ बिबट्यांचा अधिवास असल्याचा अंदाज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलेल्या ‘स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया, २०१८’ अहवालातून व्यक्त केला आहे. बिबट्यांच्या संख्येबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यात अंदाजे १ हजार ६९० बिबटे असल्याचे अहवालातून उघड झाला आहे. 

बिबट्यांची ही गणना व्याघ्र अधिवास क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. मात्र, संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या संख्येने असल्याने त्यांची एकूण संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे बिबट्यांच्या संख्येची माहिती देणारा अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार २०१४ च्या तुलनेत २०१८ साली देशामध्ये बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली आहे.

२०१४ साली भारतात ७,९१० बिबट्यांचा अधिवास होता. 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण' (एनटीसीए) आणि 'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) यांनी मिळून बिबट्या गणना अहवाल तयार केला. देशात पार पडलेल्या व्याघ्र गणनेच्या कामावेळीच या संस्थांनी बिबट्याचीही गणना केली होती. २०१८ च्या अहवालानुसार देशामध्ये मध्यप्रदेश राज्यात बिबट्यांची सर्वाधिक संख्या (३,४२१) असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक (१,७८३) आणि महाराष्ट्राचा (१,६९०) क्रमांक लागला आहे.

देशात वनक्षेत्रांबरोबर शेत जमिनींमध्ये (चहा, कॉफी आणि उसाची शेती) बिबट्यांचा अधिवास आहे. संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बिबट्यांची ही गणना केवळ वाघांचा अधिवास असणाऱ्या संरक्षित वनक्षेत्रांमध्येच पार पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात राज्यात १७४ बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. तसेच मानव-बिबट्या संघर्षामध्ये मृत्युमुखी किंवा जखमी झालेल्या माणसांची संख्याही यंदा गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. बिबट्यांच्या मृत्यूची वाढती संख्या पाहता वन विभागाने त्यासंदर्भातील कृती आराखडा (अॅक्शन प्लॅन) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या संख्येने आहे. 

संरक्षित वनक्षेत्रांबाहेर बिबट्यांची संख्या अधिक 
महाराष्ट्रात संरक्षित वनक्षेत्रांबाहेर बिबट्यांची संख्या अधिक आहे. उसाच्या शेतात अधिवास करणाऱ्या बिबट्यांची गणना केलेली नाही. महाराष्ट्रात वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा अधिवास असल्याने राज्यातील बिबट्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. बिबट्या संवर्धन आणि संरक्षणसंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. हा अभ्यास गट वनक्षेत्राबाहेरील वावरणाऱ्या बिबट्यांबाबत उपाययोजनांचा सल्ला देईल. 
- नितीन काकोडकर,
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com