मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखले 

मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखले 

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत विचारविनिमयासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची उद्या (ता. 27) मुंबईत बैठक होणार आहे. 

ठाणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नवी मुंबई व मुंबईतील प्रमुख समन्वयकांना पोलिसांनी स्थानबद्ध करीत आझाद मैदानात जाण्यापासून रोखले. कोल्हापूरमधून इंद्रजित सावंत यांच्यासह काही प्रमुख समन्वयकांना अटक केल्याने मराठा समाजात सरकारविरोधात रोष सुरू झाला. आज पहाटे मुंबईत दाखल झालेले नगरचे समन्वयक संजीव भोर-पाटील, सोलापूरचे माऊली पवार, नवी मुंबईचे अंकुश कदम यांना दादर पोलिसांनी ताब्यात घेतले, तर पुण्यात राजेंद्र कोंढरे, नाशिकमध्ये करण गायकर यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, काही आंदोलक गनिमी कावा करीत आझाद मैदानात पोचले व त्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलकांनी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. 

विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलकांवरील दडपशाहीचा विरोध करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलकांना रात्री घरात जाऊन पोलिसांनी अटक केल्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. मराठा आंदोलक दहशतवादी आहेत काय, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला; तर सरकारची पोलिस कारवाई म्हणजे मराठा आंदोलन दडपण्याची हुकूमशाही असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

राज्यभरातून अनेक आंदोलनकर्ते मुंबईकडे निघाले असून, त्यांना रस्त्यावरच अडवण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर पोलिसांनी नाकेबंदी केली होती. विधानभवन परिसराला तर छावणीचे स्वरूप आले होते. दक्षिण मुंबईत बहुतांश ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावत नाकेबंदी केल्याने सामान्य नागरिकांसह आमदारांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. 

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करण्यात आली. त्यानंतर हे आंदोलक आझाद मैदानावर दाखल होत ठिय्या मांडून बसले. आरक्षण व मराठा समाजाच्या इतर वीस मागण्या जोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. पोलिसांच्या दडपशाहीचाही तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. 

मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक 
उद्या (ता. 27) सकाळी दहा वाजता विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये मराठा आरक्षण व मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यात येईल. मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर मांडावा की नाही, यावर या बैठकीत एकमत होण्याचे संकेत आहेत. 

- मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर नाकेबंदी 
- विधानभवन परिसराला छावणीचे रूप 
- मुंबईला निघालेले 43 आंदोलक पुण्यात स्थानबद्ध 
- परळीतील (जि. बीड) बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस 
- औरंगाबादेत मराठा मावळा संघटनेची निदर्शने 
- नाशिकमध्ये नाकाबंदी; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची धरपकड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com