मराठा बटालियनचा देशाला अभिमान : जनरल बिपिन रावत 

मराठा बटालियनचा देशाला अभिमान : जनरल बिपिन रावत 

कोल्हापूर : "मराठा लाइट इन्फंट्री बटालियनचा इतिहास उच्च दर्जाचा आहे. जिथे संधी मिळाली तेथे बटालियनने बहादुरीचे दर्शन घडविले आहे. त्याचा भारतीय सेना व देशाला गर्व आहे,'' असे गौरवोद्‌गार देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी येथे काढले. 

टेंबलाई टेकडी परिसरातील 109 इन्फंट्री टी. ए. बटालियन यांच्या वतीने माजी सैनिक महामेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. 109 इन्फंट्री टी. ए. बटालियन यांच्या वतीने सरकारच्या विविध सेवांची माहिती देण्यासाठी आजचा माजी सैनिकांचा मेळावा आयोजिला होता. येथे माजी सैनिकांना देण्यासाठी येत असलेल्या कंपन्या आणि संस्थांच्या सवलतींची माहिती देण्यात आली. देशसेवेदरम्यान अपंगत्व आलेल्या सैनिकांना वाहन, तसेच वीरमाता व वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. येथे उभारलेल्या स्टॉललाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ब्रिगेडिअर संजीव तिवारी, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. 

बटालियनचा आजपर्यंतचा इतिहास शौर्याचा आहे. येथून पुढेही लढाईची वेळ आली तर बटालियनकडून विजयाची परंपरा कायम राहील. मराठा बटालियनला यापुढेही युद्धाचा सामना करावा लागला, तरीही ते हीच परंपरा पुढे कायम ठेवतील. मराठा जवानांनी साहस, दृढता आणि संकल्प यांचे निःस्वार्थीपणाने पालन केले आहे, असे रावत म्हणाले. जवानांना उद्देशून बोलताना रावत म्हणाले, ""जीवनातील उमेदीचा काळ तुम्ही देशासाठी आणि सैन्याला दिला आहे. खतरनाक भागात तुम्ही सेवा बजावली आहे. लढला आहात याची जाणीव सैन्यदलाला आहे. म्हणूनच तुमच्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अशा मेळाव्यांमधून तुम्हाला येणाऱ्या समस्या व सरकारच्या सुविधा तुमच्यापर्यंत पोचविण्याचा सैन्यदलाचा प्रयत्न आहे. आपल्या परिवाराला, संबंधितांना सैन्याविषयी माहिती द्या, जास्तीत जास्त जवान तयार करण्यास मदत करा.'' 

छत्रपती घराण्याविषयी त्यांनी आदराची भावना व्यक्त केली. श्रीमंत शाहू महाराज सैन्यदलाच्या कठीण परिस्थितीतही साथ देतात. राजाराम रायफल्सपासून त्यांची सैन्याला मदत करण्याची भावना आहे. आता पुढची पिढी म्हणजे खासदार संभाजीराजे व मालोजीराजेसुद्घा ही जबाबदारी सांभाळत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शत्रूला हत्यारे टाकून पळावे लागते 
लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू म्हणाले, ""मराठा बटालियन ही सैन्यदलाची वीरभूमी, कर्मभूमी आहे. आम्ही तर म्हणतो रेजिमेंटची ही राजधानी आहे. येथून सैन्यदलात येणारे 40 टक्के जवान हे मराठा बटालियनचे, या भागातील आहेत. "मर्द आम्ही मराठा खरे, दुश्‍मनाला भरे कापरे' या वाक्‍यातील खरे हा शब्द मराठ्यांच्या शौर्याचे, प्रामाणिकपणाचे आणि हुशारीचे प्रतीक आहे. मराठा जेव्हा रणभूमीत उतरतो, तेव्हा शत्रूला हत्यारे टाकून पळ काढावा लागतो.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com