'मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीचा वापर राजकारणासाठी करू नये'

दीपा कदम
बुधवार, 24 जुलै 2019

मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील काही जणांना विधानसभा निवडणूकीचे वेध लागल्याने शिस्तबध्द असणाऱ्या क्रांती मोर्चा दुभंगण्याच्या वाटेवर आहे. निवडणूक लढवावी अशी भूमिका एका गटाने घेतली असून काही समन्वयकांनी मात्र राजकारणाच्या आखाड्यापासून दूर राहण्याची ठाम भूमिका मांडली आहे.

मुंबई - मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील काही जणांना विधानसभा निवडणूकीचे वेध लागल्याने शिस्तबध्द असणाऱ्या क्रांती मोर्चा दुभंगण्याच्या वाटेवर आहे. निवडणूक लढवावी अशी भूमिका एका गटाने घेतली असून काही समन्वयकांनी मात्र राजकारणाच्या आखाड्यापासून दूर राहण्याची ठाम भूमिका मांडली आहे.

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली साडेतीनशे वर्षानंतर समाज रस्त्यावर उतरला, तो कोणत्याही राजकारणात सहभागी होण्यासाठी नाही. मराठा क्रांती मोर्चा ही चळवळ असल्याने तिला राजकारणाच्या आखड्यात उतरवू नका असा स्पष्ट इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिला आहे. निवडणूक लढविण्याची इच्छा असणाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षातून उभे राहावून निवडणूक लढवावी, मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीचा वापर राजकारणासाठी करू नये अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे काल जाहीर केले. ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गाजर दाखवून फक्‍त राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याची टिका करत पाटील यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली होती.

मराठा क्रांती मोर्चाच्या इतर समन्वयकांनी मात्र याविषयी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, मराठा क्रांती मोर्चा ही राजकारण आणि संघटना विरहित चळवळ आहे. या चळवळीच्या मागे कोणताही राजकीय पक्ष आणि नेता नाही. निवडणूका लढवून दोन तीन आमदार निवडून आणल्याने समाजाचे भले कसे होणार? राजकारणाच्या बाहेरूनच दबाव आणून समाजाची कामं करता येतील, मात्र त्या राजकारणाचा भाग झाले तर ही चळवळ संपून जाईल अशी भितीही पवार यांनी व्यक्‍त केली.

मराठा क्रांती मोर्चाला राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे स्पष्ट करत पवार यांनी सर्व राजकीय पक्षांमध्ये मराठा नेतृत्व आहे. ते आपापल्या पक्षांमध्ये राहून ते समाजाचे काम करतच असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली निवडणूक आयोग नोंदणी देत नाही. शिवाय जातीच्या नावाखाली निवडणुका लढविता येत नाहीत आणि मत मागता येत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Politics Virendra Pawar