मराठा क्रांती मोर्चाचे "संवाद यात्रा'चे हत्यार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल सरकारला सादर झाला असताना उद्या (ता. 16) पासून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात "मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासह इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्याने मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी या यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 19) पासून सुरू होत असल्याने सरकार व विरोधकांना मराठा समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. 16 नोव्हेंबर सुरू होणाऱ्या या यात्रा 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत विधान भवनावर धडकणार असून, सरकारला आरक्षणाच्या निर्णयासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी पुन्हा आक्रमक होणार असल्याचे संकेत आहेत. 

मराठा आरक्षणा सोबतच कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच मराठा वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्‍न, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, ईबीसी सवलतीमधील सावळागोंधळ, मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा संवाद यात्रा सरकारवर दबाव वाढवणार आहे. 

प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने या संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सलग चौदाव्या दिवशीदेखील आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. या कार्यकर्त्यांची तब्येत खालवत असताना आंदोलन मागे घेण्याची विनंती सरकारने केली आहे. मात्र मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा व मराठा क्रांती मोर्चातील सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषणाकर्त्यांनी दिला आहे. 

Web Title: Maratha Kranti Morcha sanvad yatra