मराठा मोर्चाचा लाभ घेण्याचा भाजपचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - कोणत्याही राजकीय भूमिकेशिवाय सकल मराठा समाज शांततेच्या मार्गाने मोर्चे काढत असताना, या एकीचा राजकीय लाभ उठवण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेत राजन घाग या मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित एका कार्यकर्त्याला उमेदवारी देत भाजपने समाजाच्या भावनांचे श्रेय लाटण्याची खेळी सुरू केल्याची टीका सोशल मीडियात सुरू झाली आहे.

मराठा क्रांती मोर्चा हा पूर्णत: अराजकीय असून, कोणत्याही पक्षाशी या मोर्चाचा संबंध नाही. मुंबईतले भाजप उमेदवार राजन घाग हे मराठा क्रांती मोर्चातील एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून सहभागी होते. त्यांची स्वत:ची जनसंपर्क क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कोणत्याही पदावर ते नसताना, भाजपच्या काही नेत्यांनी माध्यमांसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधीला उमेदवारी दिल्याचे अनौपचारिकरित्या सांगितले. त्यावरून माध्यमांमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधीला भाजपची उमेदवारी असे वृत्त प्रसारित करण्यात आले. यावरून सोशल मीडियात दुपारपासून भाजपच्या या राजकीय खेळीवरून चर्चा सुरू आहे.

राज्यभरात सर्वच पक्षांत मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते आहेत. मात्र, मराठा क्रांती मोर्चात सहभागी होताना राजकीय भूमिका बाजूला करत त्यांनी योगदान दिले आहे. मुंबईतही अनेक वरिष्ठ मराठा कार्यकर्ते क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी सरसावलेले आहेत. 6 मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चाची तयारी सुरू असताना भाजपने मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याची "कुजबूज' सुरू करीत क्रांती मोर्चाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केल्याचे पडसाद सोशल मीडियात उमटत आहेत.

Web Title: Maratha morcha