Maratha Reservation : धडकी, धडक आणि धरपकड! 

Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसह मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या "मराठा संवाद यात्रे'च्या मुद्द्याचे राजकीय- सामाजिक वादळात रूपांतर झाल्यास आगामी निवडणुकांत ते अडचणीचे ठरू शकते, या शक्‍यतेने धडकी भरलेल्या सरकारने रविवारी रात्रीपासूनच राज्यभरात धरपकडीचे सत्र सुरू केले. या यात्रेसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा मोर्चाच्या समन्वयकांना, तसेच कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी स्थानबद्धता, जागोजागी नाकाबंदीसारखे पाऊल उचलले. त्यानंतरही गमिनी काव्याने सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. सरकारने सुरू केलेल्या अटकसत्राचे अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्नही केला. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील आंदोलने आणखी तीव्र होऊ नयेत, या हेतूने राज्य सरकारने या समाजास स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, या आश्‍वासनात स्पष्टता नसल्याने आरक्षणाविषयी साशंक असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील हजारो आंदोलकांनी मुंबईत कूच करण्यास सुरवात केली होती. मात्र, गेल्या वर्षी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार, त्यामुळे झालेल्या राजकीय कोंडीचा अनुभव गाठीशी असलेल्या गृह खात्याने रविवारी रात्रीपासूनच मराठा क्रांती मोर्चाच्या कोल्हापूरमधील इंद्रजित सावंत यांच्यासह अनेक समन्वयकांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. दादर पोलिसांनी सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झालेले नगरचे समन्वयक संजीव भोर-पाटील, सोलापूरचे माउली पवार, नवी मुंबईचे अंकुश कदम यांना ताब्यात घेतले. पुण्यात राजेंद्र कोंढरे, तर नाशिकमध्ये करण गायकर यांना पोलिसांनी अटक केली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिकमधील प्रमुख समन्वयकांनाही स्थानबद्ध करत त्यांना आझाद मैदानात जाण्यापासून रोखण्यात आले. राज्यभरात अनेक आंदोलकांनाही रस्त्यावरच अडवण्यात आले. मुंबई- पुणे एक्‍स्प्रेस वेसारख्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदीही करण्यात आली. विधान भवन परिसराला तर छावणीचे रूप आले होते. दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी बॅरिकेड्‌सही टाकण्यात आले होते. त्यानंतरही काही मराठा आंदोलकांनी गनिमी काव्याने आझाद मैदान गाठले. त्यांनी तेथे सरकारविरोधी घोषणाबाजीही केली. 

आंदोलकांचा आझाद मैदानात ठिय्या 
सायंकाळी पाचच्या सुमारास अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्या आंदोलकांनी आझाद मैदानात ठिय्या ठोकला. जोवर आरक्षण व मराठा समाजाच्या अन्य 20 मागण्या सरकार पूर्ण करत नाही, तोवर आझाद मैदान सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

आंदोलक दहशतवादी आहेत काय? 
पोलिसांनी रविवारी रात्री काही आंदोलकांच्या घरात जाऊन त्यांना अटक केल्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. हे आंदोलक दहशतवादी आहेत का, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला, तर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे मराठा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे, ही हुकूमशाहीच असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

अहवालावर आज चर्चा 
विधान भवनात आज (ता. 27) सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल विधिमंडळाच्या पटलावर मांडावा की नाही, यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com