
Youth Suicide Incident in Ambajogai’s Sugav Village: मराठा आरक्षणाच्या मुद्य्याने सध्या राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो बांधव मैदानावर हजर आहेत. शिवाय राज्यभरातूनही अनेकजण मुंबईत दाखल होत आहेत.
या दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे आज(शनिवार) एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका तरूणाने मराठा आरक्षणाच्या मागणी करत थेट गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतरही, मराठा आरक्षणाबाबत अद्यापपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे सुगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी नितीन चव्हाण या तरुणाने आत्महत्या केल्याचं माहिती होताच मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेले जवळपास ८० तरुण सुगाव गावाकडे परत निघाले आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.