#MarathaKrantiMorcha राज्यभरात आंदोलनाचे हिंसक पडसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली. 

पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली. 

मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक सुरू आहे. सरकारी कार्यालये आणि खासगी आस्थापनांचे कामकाज सुरू आहे. पश्‍चिम उपनगरांपेक्षा मध्य मुंबईमध्ये 'बंद'चा प्रभाव जास्त जाणवत आहे. जोगेश्‍वरी, ठाणे येथे लोकल वाहतूक रोखण्यात आली. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बसची तोडफोड झाली. नवी मुंबई येथे पोलिसांच्या गाड्या पेटविण्यात आल्या. कळंबोलीमध्ये हिंसक आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पनवेलमध्ये जमावाने जाळपोळ केली. 

नाशिक : नाशिक-दादर मार्गावर हिंसक घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वणी, करंजाड, देवळा, डांगसौन्दाने, न्यायडोंगरी, एरंडगाव, लखमापूर, बागलाण, सायखेडा, अंदरसु येथे कडकडीत बंद दिसून येत आहे. निफाडला रास्ता रोको आंदोलन झाले. 

पुणे : हिंसक आंदोलनामुळे पुण्यातून राज्यभरात होणारी एसटीची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. स्वारगेटहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. पुणे सोलापूर मार्गही बंद आहे. आज सकाळी पुणे-मुंबई मार्गावर काही रेल्वे धावल्या; पण आता रेल्वे वाहतूकही ठप्प आहे. शिवाजीनगर स्थानकावरून औरंगाबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द झाल्या आहेत. पुणे-नगर मार्ग पूर्णपणे बंद आहे. 

औरंगाबाद : परभणी जिल्ह्यात कोणतेही आंदोलन नाही. सर्व जिल्हा शांत आहे. बस, रेल्वे सेवा सुरळीत सुरु आहे. परभणी जिल्ह्यातील बाजारपेठही सुरू आहे. 

सोलापूर : करमाळा तालुक्‍यात आंदोलकांना जागरण-गोंधळ घातला. पोथरे नाक्‍यापासून शहरातील मुख्य मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो बोकडाच्या गळ्यात अडकवून मिरवणूक काढण्यात आली. 

कऱ्हाड : मसूर रस्त्यावर आंदोलकांनी दत्तनगर येथे टायर पेटवून मार्ग बंद पाडला. यामुळे वाहतूक कोंडी झाली.

सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आंदोलकांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. आक्रमक आंदोलकांच्या दगडफेकीत पोलिस अधीक्षक संदीप पाटील जखमी. जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. महाबळेश्‍वर तालुक्‍यात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. 

बीड : भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आणि कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Kranti Morcha stir escalates, protesters turn violent