राज्यात सर्व शाळांमध्ये 'या' दिवसापासून मराठी भाषा सक्तीची!

राज्यात सर्व शाळांमध्ये 'या' दिवसापासून मराठी भाषा सक्तीची!

पुणे - राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याबाबत राज्य सरकारने  कायदा तयार करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार कायद्याचे प्रारूप तयार करण्यात आले असून, येत्या २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी राजभाषा दिना’स हा कायदा राज्याच्या विधिमंडळात संमत करण्याची ग्वाही राज्य सरकारने दिली.

राज्यातील सारस्वतांकडून मराठी भाषा सक्तीची करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. राज्यात नवे सरकार आल्याने त्यांच्याकडेही ही मागणी करण्यासाठी माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मधुमंगेश कर्णिक, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि दादा गोरे यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांची नुकतीच भेट घेतली आणि शाळांमध्ये मराठीची सक्ती करण्याबाबत आग्रही मागणी केली.

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना देशमुख म्हणाले, ‘‘शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याची मागणी आम्ही केली. त्यावर येत्या २७ फेब्रुवारीला त्यासंबंधीचा कायदा विधिमंडळात पारीत करून मराठी जनतेला भेट देण्याची ग्वाही सुभाष देसाई यांनी दिली. हा कायदा संमत झाल्यानंतर तातडीने त्याची नियमावली जारी करून कायद्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू करावी, असा आग्रह राज्य सरकारकडे धरला. त्यालाही त्यांनी सहमती दर्शविली.’’

राज्य सरकार सध्या पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याबाबत विचार करत आहे; परंतु ही सक्ती बारावीपर्यंतच्या शाळांना असावी, अशी विनंती देसाई यांना केल्याचे देशमुख यांनी सांगितले.

राज्यात मराठी भाषा विभाग कार्यरत आहे; परंतु त्याचे बजेट अगदी कमी आहे. सुमारे २६ कोटी रुपये अर्थसंकल्पी तरतूद केली आहे. या रकमेतून अपेक्षित भाषा विकास होत नाही. त्यामुळे ही तरतूद शंभर कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणीही राज्य सरकारकडे करण्यात आली.
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com