मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॅक फ्रायडेची हॅट्‌ट्रिक

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवामुळे प्रेक्षक फिरकत नाहीत
चित्रपटनिर्माते नानूभाई जयसिंघानी म्हणाले की, गणेशोत्सवकाळात मराठी चित्रपट चालत नाहीत, असे वितरक सांगतात. एका अर्थी ते खरेही आहे. मराठी माणसे गणेशोत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये असतात. प्रेक्षक येण्याची शक्‍यता अगदी कमी असल्याने निर्मातेही धाडस करीत नाहीत.

मुंबई - मराठी चित्रपट क्षेत्रात सध्या दर्जेदार निर्मिती होत आहे. बॉलिवूडच्या तोडीस तोड सिनेमे आपल्याकडे बनत आहेत. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्याही वाढली. एकाच दिवशी दोन किंवा तीन-तीन चित्रपट प्रदर्शित करावे लागत आहेत; पण गेल्या तीन आठवड्यांत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तब्बल तीन आठवडे मराठीसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ गेल्यामुळे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची गती मंदावली की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मराठी चित्रपट प्रदर्शित होत होते. उत्सवाच्या धामधुमीतही प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येत होते. मराठीतील सुपरहिट ‘माहेरची साडी’ चित्रपट गणेशोत्सवातच काही ठिकाणी प्रदर्शित झाला होता. त्यानंतरही काही काळ अशी परंपरा सुरू होती; पण अलीकडच्या काळात त्यात खंड पडला. ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरच्या शुक्रवारी एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. येत्या १३ सप्टेंबर रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. २० सप्टेंबरलाही कोणताही मराठी चित्रपट लागण्याची चिन्हे नाहीत. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये एवढे अंतर पडत चालले, तर हुकमी प्रेक्षकवर्ग हुकण्याची शक्‍यता आहे. तीन-चार आठवड्यांच्या अंतरामुळे पुढील तीन महिन्यांमध्ये मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची रांग लागणार आहे. कदाचित गणेशोत्सवाची धामधूम आणि येणाऱ्या पितृपक्षामुळे निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस केले नसावे. 

हिंदीमध्ये ‘साहो’ आणि त्यापाठोपाठ आलेला ‘छिछोरे’ चांगला व्यवसाय करीत आहेत. त्यातच एखाद-दुसरा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असता तर नक्कीच त्याचे स्वागत झाले असते; परंतु सणासुदीच्या दिवसांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणत्याही निर्मात्याने केलेले नाही. 

याबाबत वितरक समीर दीक्षित म्हणाले, की सध्या बाजारात मंदीचे सावट आहे आणि त्यातच गणेशोत्सव, त्यामुळे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. आता येणाऱ्या पितृपक्षातही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Movie Black Friday Entertainment