आता भाजपबरोबर युती नाही : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

केंद्रात मजबूत सरकार आल्यास देशाचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. या सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासन पाळले नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्‍यात गेली आहे. जसा पक्ष असतो, तसेच त्या पक्षाचे नेतृत्व असते. मोदी यांचा उदो उदो केला जातो, मात्र खासदार कसे वागतात, ते आपण पाहतच आहोत.

पारनेर - ""केंद्रामध्ये मजबूत व भक्कम सरकार यावे म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पाठिंबा दिला, ते केवळ "अच्छे दिन' येतील म्हणूनच. परंतु, त्यांनी केवळ फसव्या घोषणा करून खोटी स्वप्ने दाखवली. या सरकारला चार वर्षे झाले, तरी "अच्छे दिन' आले नाहीत. या सरकारने जनतेला फसविल्याने इथून पुढे भाजपशी युती करणार नाही व स्वतंत्रपणे निवडणूक लढून संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार,'' असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. पारनेर येथे आमदार विजय औटी यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "केंद्रात मजबूत सरकार आल्यास देशाचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. या सरकारने निवडणूक काळात दिलेले आश्वासन पाळले नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्‍यात गेली आहे. जसा पक्ष असतो, तसेच त्या पक्षाचे नेतृत्व असते. मोदी यांचा उदो उदो केला जातो, मात्र खासदार कसे वागतात, ते आपण पाहतच आहोत. शिवसैनिक सर्वसामान्य माणसाप्रमाणे सामान्यच राहतो व वागतो. आज अनेकांनी बॅंकांत गैरव्यवहार करून पैसे खाल्ले व परदेशात पळून गेले. दुसरीकडे शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅंकेला टाळे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानला धडा शिकवू, अच्छे दिन, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ, यांसह अनेक फसव्या घोषणा या सरकारने केल्या. जो कोणी स्वप्न दाखवतो त्याचे भले होते; मात्र यापुढे अशा चमत्कारी बाबांचे खपवून घेतले जाणार नाही. आश्वासन काय दिले, याची विचारणा आम्हाला यापुढे लोकसभा निवडणुकीवेळी करावी लागेल. यांचे कार्यकर्ते व नेते शिवाजी महाराजांचे नाव फक्त निवडणुकीपुरते घेतात. प्रत्यक्षात महाराजांबद्दल व शिवजयंतीबद्दल यांचे वक्तव्य कसे असतात, याची जाणीव तुम्हाला झालीच आहे.''

ठाकरे म्हणाले, "आम्ही भगव्याचे पाईक आहोत. शिवाजी महाराज यांची आठवण आम्हाला निवडणुकीपुरती होत नाही, तर त्यांचे स्थान आमच्या हृदयात आहे. तुम्ही ज्या घोषणा देत आहात त्या घोषणांत मला महाराष्ट्र भगवा झाल्याचे दिसतो. महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री व आमचे सरकार दिसते.''

Web Title: marathi news bjp shinsena Uddhav Thackeray