कर्नाटकमधील निवडणुकांमुळे कोंबड्या खाताहेत भाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक ः उन्हाच्या झळ्यांनी हैराण झालेल्या ब्रॉयलर कुक्कुटपालन उद्योगाला कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीमुळे दिलासा मिळाला. महाराष्ट्रात 62 रुपये किलो भावाने कोंबड्या विकल्या जात असताना, कर्नाटकमध्ये 72 रुपये किलो भाव मिळतोय. उष्णतेच्या तडाख्याने उत्पादन कमी होत चाललेल्या राजस्थानमध्ये कर्नाटकइतक्‍या भावाने कोंबड्या विकल्या जाताहेत. 

उन्हाळ्यात ब्रॉयलर कोंबड्या उत्पादन कमी व्हायचे आणि एप्रिल-मे महिन्यात भाव वाढायचे, असा अनुभव गेल्या वर्षीपर्यंत उत्पादकांना होता. मध्यंतरी झालेल्या आंदोलनामुळे राज्यात सहा हजार टन कोंबड्या फार्ममध्ये शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे किलोला 67 रुपये हा उत्पादनखर्च येत असताना, विक्री 62 रुपयांना करावी लागते. आता लग्नसराई सुरू झाल्याने येत्या आठवडाभरात शिलकीसह कोंबड्यांची विक्री होईल आणि भाववाढीला चालना मिळेल, असा उत्पादकांचा अंदाज आहे. 
फार्ममधील कोंबड्या उष्णतेच्या धगीमुळे दिवसा खाद्य खात नाहीत. त्यामुळे एरवीच्या तुलनेत कोंबड्यांच्या वजनात 25 टक्‍क्‍यांनी घट होऊ लागली आहे. उष्णतेने कोंबड्या मरण्याचे प्रमाण नऊ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून उत्पादकांचा दिवसाचा कोंबडीमागे दोन रुपयांनी खर्च वाढला आहे. त्यातच पाण्याच्या उपलब्धतेअभावी कोंबड्यांचे उत्पादन काही उत्पादकांनी बंद केले आहे. सिन्नर, मालेगाव व चांदवड या भागात उत्पादकांना कोंबड्यांना पाणी देण्यासाठी टॅंकर विकत घ्यावे लागताहेत. 

खाद्याचे भाव स्थिरावलेले 

ब्रॉयलर कोंबड्यांना उष्णतेने बसलेल्या दणक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर खाद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. मक्‍याचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनचे भाव जानेवारीत वाढलेल्या अवस्थेत स्थिरावले आहेत. अशा परिस्थितीत कोंबड्यांचे खाद्य 24 ते 25 रुपये किलोपर्यंत पोचले आहे. 

ब्रॉयलर कोंबड्यांचा भाव 
(किलोला रुपयांमध्ये) 
- गुजरात- 68 
- कर्नाटक सीमेवर- 65 
- मध्य प्रदेश- 67 ते 68 
- मुंबई- 62 

Web Title: marathi news chicken