व्हिडीओबाबत कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई - "टी सीरिज'तर्फे यू-ट्यूब व अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या व्यावसायिक व्हिडीओंमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नृत्य करताना आणि गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

सावंत यांनी सांगितले की, या अगोदरही अशाच तऱ्हेचे काही व्हिडीओ टी सीरिज कंपनीतर्फे प्रसारित करण्यात आले होते; परंतु राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी व पोलिस नृत्य आणि गायन करताना प्रथमच दिसलेले आहेत. मुख्यमंत्री हे राज्यातील 12 कोटी जनतेला उत्तर देणारे व्यक्‍तिमत्त्व असल्याने कॉंग्रेस पक्ष या संदर्भात काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत असून, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. 

टी सीरिज कंपनीशी सरकारचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे? यामधील आदान-प्रदान काय आहे, सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र सरकार अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही; त्यामुळे सरकारचा या कंपनीशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा. जर सरकारशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली? त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली? मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का? कलाकारांचे मानधन कोणी दिले व या व्हिडीओचा खर्च कोणी केला, असे अनेक प्रश्‍न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news congress music video Mharashtra CM