बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरवात होऊन एक आठवडा झाला, तरीही विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून नियमानुसार कामकाज करण्यात येत नसल्याच्या मुद्यावर विरोधी बाकावरील सदस्यांशी सातत्याने खडाजंगी होत आहे. त्यामुळे अध्यक्ष बागडे यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विधानसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

मुंबई - अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरवात होऊन एक आठवडा झाला, तरीही विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून नियमानुसार कामकाज करण्यात येत नसल्याच्या मुद्यावर विरोधी बाकावरील सदस्यांशी सातत्याने खडाजंगी होत आहे. त्यामुळे अध्यक्ष बागडे यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विधानसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

विधान भवनातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

विखे-पाटील म्हणाले, ‘‘अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांचे अभिभाषण झाले. नियमानुसार सभागृहात राज्यपालांच्या भाषणावर चर्चा होऊन विरोधकांनी सूचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव केला जातो. तसेच या चर्चेला मुख्यमंत्र्याचे उत्तर होते. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळातच पुरवणी मागण्यावरील आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली.’’

‘‘धनंजय मुंडे आणि प्रशांत परिचारक यांच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज रोखून धरले असताना आज अध्यक्ष बागडे यांनी मागील कामकाज घेतले नाही. विरोधी पक्षातील सदस्य कामकाज नियमाने व्हावे यासाठी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन वारंवार येऊन घोषणा देत अध्यक्षांचे लक्ष वेधत होते. मात्र अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशा पद्धतीने कामकाज करणे हा लोकशाहीचा खून आहे,’’ असा आक्षेप राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी या वेळी घेतला.

‘‘सभागृहात कामकाज न झालेल्या मुद्यावर सभागृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना नियमबाह्य पद्धतीने निवेदन करण्यास देणे यासह अनेक प्रश्नी अध्यक्षांचा पक्षपातीपणा दिसून येतो,’’ असा आरोप जयंत पाटील यांनी केला. 

याशिवाय गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंजूर करणे, पुरवणी मागण्यांवरही चर्चा न करताच त्याही मंजूर करणे यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, गृह विभाग, महसूल विभागासारख्या महत्त्वाच्या विभागांवरील चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यावर चर्चाच होऊ द्यायची नाही आणि घ्यायची नाही, असा चंग बागडे यांनी बांधल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

उद्योगमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग
‘‘एक मार्च रोजीच्या तारांकित प्रश्नोत्तरात नाणार प्रकल्पावरील प्रश्नाला सकारात्मक उत्तर दिले. मात्र सभागृहात त्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. त्यामुळे त्यावर निवेदन देणे चुकीचे होते. तरीही उद्योग मंत्र्यांनी पूर्वीच्या उत्तरापेक्षा वेगळे, विरोधी निवेदन करत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावेत अशी सूचना केली. यावरून विधानसभेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत असल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आणण्यात येईल,’’ असे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

Web Title: marathi news Disbelief resolution against Haribhau Bagade maharashtra