मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही - खडसे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना स्थान मिळणार का, त्यांचे राजकीय पुनर्वसन कधी होणार, याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत; पण खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना, आता या सरकारमध्ये मंत्री होण्याची अजिबात इच्छा नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. 

जळगाव जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांसह अन्य प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह विधिमंडळात; तसेच विधिमंडळाबाहेर आवाज उठवणार आहे. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून, आम्ही जिल्ह्यातील सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. जनता व्यथित असताना आता मंत्री होऊन करणार काय? त्यापेक्षा सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला जाब विचारू, असे ते म्हणाले.

खडसे यांच्या पुण्यातील भोसरीतील वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी चौकशी करणारे माजी न्यायाधीश झोटिंग यांनी सरकारला अहवाल देऊन सहा महिने उलटले. दरम्यान, खडसे यांनी पक्षासाठी ४० वर्षे काम केले असून ते वर्षभराहून अधिक काळ मंत्रिमंडळाबाहेर आहेत. त्यांना झाली एवढी शिक्षा पुरेशी आहे, असे सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांचे मत आहे.

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पक्षप्रवेशासाठी आलेले खुले आमंत्रण आणि खडसे यांनी  सरकारला दिलेले खुले आव्हानाची चर्चा रंगली होती. आता त्यांनीच मंत्रिमंडळ प्रवेशाचा पर्यायावर स्वतःहून फुली मारल्याने ते मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरतील, असे बोलले जाते.

Web Title: marathi news eknath khadse Cabinet