'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका!

Sarkarnama.in
गुरुवार, 22 जून 2017

शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल' यापेक्षा 'सरकार अस्थिर कसे होईल' यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते. मुख्यमंत्र्यांशी होणारी चर्चा उधळून लावण्याचाच काही जणांचा प्रयत्न चालला होता

पुणे : 'कटाप्पाने बाहुबलीला का मारलं?' याच्यानंतर उभ्या महाराष्ट्राला सतावणारा प्रश्‍न म्हणजे 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयाजी सूर्यवंशी यांच्या कानात काय सांगितलं?'..! या प्रश्‍नासह शेतकरी संपासंदर्भातील अनेक मुद्यांवर जयाजी सूर्यवंशी यांनी आज (बुधवार) 'सरकारनामा'शी संवाद साधला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मध्यरात्री झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर संप मागे घेतल्याचे जयाजी यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर सांगितले आणि त्यानंतर या आंदोलनात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्या रात्री चर्चेपूर्वी, चर्चेदरम्यान आणि चर्चेनंतर नेमक्‍या काय घडामोडी झाल्या, तेही जयाजी यांनी 'सरकारनामा'च्या फेसबुक पेजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले. 

''शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल' यापेक्षा 'सरकार अस्थिर कसे होईल' यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते. मुख्यमंत्र्यांशी होणारी चर्चा उधळून लावण्याचाच काही जणांचा प्रयत्न चालला होता,' असा दावाही जयाजी यांनी यावेळी केला. 

जयाजी सूर्यवंशी म्हणाले... 

  • त्या दिवशी चर्चेला जाताना माझ्याबरोबर कोअर कमिटीचे सर्व सदस्य होते. पण 'वर्षा' बंगल्यावर गेलो, तेव्हा आमच्याआधीच डॉ. नवले नावाचे गृहस्थ तिथे येऊन बसले होते. त्यांना मी त्यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. 
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या त्या चर्चेत डॉ. नवले यांनी सुरवातीपासूनच नकारात्मक सूर लावला. तीन-चार वेळा ते बैठकीतून बाहेर गेले आणि कुणाला तरी फोन केला. बैठकीमध्येही ते इतर नऊ-दहा जणांना बोलूच देत नव्हते. त्यामुळे मला त्यांना थांबविणे भाग पडले. 
  • 22 मेच्या बैठकीमध्ये डॉ. नवले आले होते आणि तेव्हा म्हणाले होते, की शेतकऱ्यांचा संप होऊच शकत नाही. 30 मे रोजी त्यांनी शेतकऱ्यांच्या संपाविरोधात लेखही लिहिला आहे. 
  • मृत:प्राय झालेल्या संघटना या शेतकरी संपाच्या माध्यमातून जिवंत झाल्या. 
  • चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री मला म्हणाले, "तुम्ही आता बाहेर जाऊन माध्यमांशी फार चर्चा करू नका. त्यातून आणखी गोंधळ निर्माण होऊ शकेल. शब्दाला शब्द वाढत जाईल आणि मुद्दा बाजूला पडेल.'' 
  • मी भाजपचा कार्यकर्ता नाही. 
  • राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांनी माझ्यावर वाईट भाषेत टीका केली. पण त्याचे वाईट वाटले नाही. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत; तुमच्यासारखे मुरब्बी राजकारणी नाही.
Web Title: Marathi News farmers strike Devendra Fadnavis Jayaji Suryavanshi Sarkarnama