आमदार- खासदार निधीतून दिवे लागले; वीजबिलाच्या रकमेची तरतूद होईना

राजेश सोनवणे
सोमवार, 26 मार्च 2018

जळगाव ः शहरासह ग्रामीण भागात विविध योजनांमधून तसेच आमदार- खासदारांच्या निधीतून मोठमोठे "हायमास्ट लॅम्प' लागले. लख्ख उजेडही पडला; परंतु, त्याचे वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका यांच्याकडे रक्कमच नसल्याने खानदेशात सुमारे 362 कोटी 44 लाख रुपये थकीत आहेत. त्यामुळे आता या थकीत बिलापोटी ग्रामीण भागातील "हायमास्ट'ची वीज खंडित करण्याची कारवाई "महावितरण'कडून करण्यात येणार आहे. 

जळगाव ः शहरासह ग्रामीण भागात विविध योजनांमधून तसेच आमदार- खासदारांच्या निधीतून मोठमोठे "हायमास्ट लॅम्प' लागले. लख्ख उजेडही पडला; परंतु, त्याचे वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका यांच्याकडे रक्कमच नसल्याने खानदेशात सुमारे 362 कोटी 44 लाख रुपये थकीत आहेत. त्यामुळे आता या थकीत बिलापोटी ग्रामीण भागातील "हायमास्ट'ची वीज खंडित करण्याची कारवाई "महावितरण'कडून करण्यात येणार आहे. 

मोठ्या प्रमाणावर थकबाकी 
खानदेशातील बहुतांश ग्रामपंचायतींसह नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात "हायमास्ट लॅम्प' लावण्यात आले आहेत. त्यामुळे गावे आणि शहरेही रात्री लखलखली आहेत. या "हायमास्ट'सह पथदिव्यांसाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. मात्र, या पथदिव्यांसाठी लागणाऱ्या वीजदेयके भरण्यासाठी शासनस्तरावरून तरतूदच करण्यात आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांना अखंडित वीजसेवेसाठी ग्रामपंचायतींनी स्वनिधी किंवा चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधींतून देयके अदा करावयाची असतात; परंतु देयक थकीत ठेवल्यामुळे ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांची थकबाकी वाढत गेली आहे. 

सावदा विभाग आघाडीवर 
"महावितरण'च्या जळगाव परिमंडळात अर्थात खानदेशातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांपोटी चार हजार 122 वीजजोडण्यांचे 362 कोटी 44 लाख रुपये थकीत आहेत. पथदिव्यांच्या थकबाकी रकमेत खानदेशातून सावदा विभाग आघाडीवर आहे. विभागातील ग्रामपंचायत पथदिव्यांच्या 302 वीजजोडण्यांचे 72 कोटी 17 लाख रुपये थकले आहेत, तर धरणगाव विभागात 530 वीजजोडण्यांचे 22 कोटी 45 लाख रुपये व जळगाव शहर विभागातील 111 वीजजोडण्यांचे सहा कोटी 43 लाख रुपये थकीत आहेत. जळगाव परिमंडळात फेब्रुवारी व मार्च महिन्यात काही ग्रामपंचायतींकडून 48 पथदिवे वीजजोडण्यांपोटी पाच लाख 82 हजार रुपये भरणा झाला आहे. 
 
शासनामार्फत "सीईओं'ना पत्र 
शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 28 फेब्रुवारी 2018 ला पत्र देऊन ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांची थकीत रक्‍कम भरण्याबाबत निर्देश दिले आहेत. थकीत बिलांसाठी "महावितरण'कडून वीजजोडणी खंडित करण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. म्हणून ग्रामपंचायतींकडून गावात होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून किंवा इतर निधींतून थकीत बिले भरावीत व त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
 

पथदिव्यांचे थकीत वीजबिल रक्कम 

जळगाव मंडळ 
विभाग...........पथदिवे जोडणी..........थकीत बिल 
 सावदा ...........302 ..........72 कोटी 17 लाख. 
 धरणगाव......... 530..........22 कोटी 45 लाख. 
 भुसावळ..........260...........16 कोटी 89 लाख. 
 पाचोरा........... 366.......... 12 कोटी 87 लाख. 
 मुक्ताईनगर.... ..193 ...........10 कोटी 49 लाख. 
 चाळीसगाव.......223............9 कोटी 71 लाख रूपये 
 जळगाव शहर.....111............6 कोटी 43 लाख 
 एकूण...........1,985.........151 कोटी 4 लाख रुपये 
 
धुळे मंडळ 
 धुळे ग्रामीण.......543......45 कोटी 91 लाख. 
 दोंडाईचा..........296......21 कोटी 71 लाख. 
 धुळे शहर.........197......14 कोटी 52 लाख. 
 एकूण..........1,036.....82 कोटी 15 लाख. 
 
नंदुरबार मंडळ 
 शहादा.........650.........64 कोटी 73 लाख. 
 नंदुरबार.......451.........64 कोटी 68 लाख. 
 एकूण........1,101...... 129 कोटी 44 लाख

Web Title: marathi news jalgaon vijbill pending