...या 72 तासांत भडकला महाराष्ट्र : ग्राऊंड झिरो रिपोर्ट 

बुधवार, 3 जानेवारी 2018

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत जातीय दंगे छोट्या-मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या दंग्यांची सुरूवात पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा या शिरूर तालु्क्यातील गावातून झाली. वढू बुद्रूक येथील स्मारकांना अभिवादन करण्यावरून सुरू झालेला वाद अवघ्या 72 तासांत दंग्यांमध्ये बदलला. वढू बुद्रूकमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिकांशी बोलून www.esakal.com ने नेमकी परिस्थिती समजावून घेतली....

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी क्रूरपणे हत्या केली. त्यांच्या शरीराचे तुकडे केले. पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या वढू बुद्रुक या गावी संभाजीराजांच्या शरीराचे हे तुकडे जमा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वढूच्या ग्रामस्थांनी औरंगजेबाच्या धमकीला भीक न घालता हिंमत दाखवून संभाजी राजांवर अंत्यसंस्कार केले. 

वढू गावातील लोकांशी बोलताना समजलं की त्याकाळी गावातील गोविंद गोपाळ महार (गायकवाड) यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कारासाठी जागा दिली असं काहींचं म्हणणं आहे तर गोविंद महारांच्या इतिहासाला काही पुरावा नाही, असं मानणारा एक मत प्रवाहही गावात असल्याचं दिसलं. खरंतर 2013 मध्ये संभाजी महाराजांच्या समाधीसमोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गोविंद गोपाळ यांची समाधी बांधण्यात आली. तेव्हा याला विरोध झाला नव्हता. पण गेल्या तीन वर्षांत वातावरण इतकं बदललं की गावातली लोकं हा इतिहास नाकारायला लागली. गेल्या 2-3 वर्षांत हिंदुत्ववादी संघटनांचा गावात वाढलेला वावर याला कदाचित कारणीभूत असावा.

गोविंद गोपाळ यांच्या आताच्या वंशजांकडून 28 डिसेंबरच्या रात्री समाधी जवळ एक फलक लावण्यात आला. या फलकावर त्यांनी संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख होता. संभाजी राजांचे पुत्र पाहिले छत्रपती शाहू यांनी गोविंद यांना 45 बिघा जमीन इनाम म्हणून दिली, असाही उल्लेख होता. याच फलकावर छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि स्तंभाचाही होता. या फलकाचं नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सूचनाही त्यावर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हा फलक कोणीतरी काढला आणि गोविंद गोपाळ यांच्या समाधीवरील छत्री पाडली असं गावातल्या लोकांनी सांगितलं. त्या दिवसापासून गावातील वातावरण चिघळले आहे; ते आजदेखील कायम आहे.

गोविंद गोपाळ यांच्या वंशजांच्या तक्रारीवरून त्या दिवशी गावातील 49 जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली.

या सात जणांमध्ये गावातील नवनाथ कुंभार या तरुणाचा समावेश आहे. नवनाथने गेल्या वर्षी आयटीआय चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एक महिन्यापूर्वी तो जवळील एका कंपनीत अप्रेंटिस म्हणून कामाला लागला होता. फलक काढला गेला त्या दिवशी नवनाथ कामावर होता. पण त्याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो कामावर होता याचं पत्र कंपनीकडून त्याच्या वडीलांनी मिळवल्यानंतर चार दिवसानंतर आजही तो तुरुंगात असल्याचं त्यांनी सांगितलं. अशी अनेक लोक खोट्या अॅट्रोसिटीमध्ये अडकवली गेली, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 

अॅट्रोसिटीच्या या प्रकारानंतर गावातील वातावरण तापलं होतं. त्याचाच गैरफायदा काही लोकांनी उठविला आणि वढू बुद्रुक आणि आसपासच्या गावातील लोकांना भडकवण्यात आलं. 

30, 31 डिसेंबर या दोन दिवसांत गावात काही बैठका घेण्यात आल्या. यामध्ये मराठा विरुद्ध दलित असं वातावरण पद्धतशीर भडकवलं गेलं. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणावर बौद्ध बांधव जमणार हे माहीत असल्याने ही लोक वढूला येऊन संभाजी महाराजांच्या समाधीचं नुकसान करतील, अशा अफवा पसरवण्यात आल्या. गावातील वातावरण दोन दिवसात बदललं. कसलीही जातीय वादाची पार्शवभूमी नसलेलं वढू गाव अचानक जातीयवादी बनलं. कोरेगाव भीमा पासून वढू बुद्रूकला जाणाऱ्या रस्त्यावर भगवे झेंडे शक्तिप्रदर्शन म्हणून लावले गेले असावते. त्यातून प्रतिकात्मक इशारा देण्याचा प्रयत्न केला गेला. 1 जानेवारीला वातावरण बिघडणार याची वढू बुद्रुक आणि आसपासच्या लोकांना कल्पना होती. आसपासच्या गावातील लोकांनाही 1 जानेवारी रोजी दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कदाचित अशीच कल्पना पोलीस प्रशासनालाही असावी. वढू गावात 29 डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे. 1 जानेवारीला वढू गावी मोठ्या प्रमाणावर लोकं जमली. संभाजी महाराजांच्या समाधीचं रक्षण करायचं आहे, असं सांगून या लोकांना इथं जमा करण्यात आलं होतं. या गर्दीचं रूपांतर थोड्या वेळात मोर्चात झालं आणि कोरेगावच्या दिशेने निघालेल्या या मोर्चाचं नंतर कोरेगाव भीमाला आलेल्या आंबेडकरी जनतेसमोर आल्यानंतर प्रकरण चिघळलं. त्यानंतर नेमकं काय घडलं याचा पोलिसही शोध घेत आहेत पण अशाप्रकारे दोन गट त्या ठिकाणी आल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, जाळपोळ झाली. 

मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी,चारचाकी गाड्या, रस्त्याच्या बाजूची दुकानं जाळण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी आलेला अग्निशमन दलाचा बंबही पेटवून दिला गेला. संध्याकाळपर्यंत याचं लोण महाराष्ट्रभर पसरलं. 

हा द्वेष नेमका आला कुठून?
वढू गावात 2013 मध्ये गोविंद महार यांची समाधी बांधण्यात आली; तेव्हाचं वातावरण आणि आजचं वातावरण यात बराच फरक आहे. गेली 3-4 वर्ष सतत या गावाचं वातावरण बदलण्याचा प्रयत्न होत होता. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी ज्या दोघांवर ठपका ठेवला गेला आणि पिंपरी चिंचवड येथे ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या हिंदुत्त्ववाद्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वावर आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांनी हिंदुत्त्ववादी विचारांना ठोस पर्याय उभा करण्याकडे दुर्लक्ष केले. यंदा कोरेगाव भीमाच्या लढाईला दोनशे वर्ष पूर्ण होणार आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र जमणार, हे माहीत असताना देखील अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या वढू बुद्रुक गावात असा प्रकार घडणे त्यावरून वातावरण इतकं बिघडणे याकडे पोलीस प्रशासन आणि सरकारचं दुर्लक्ष कसं काय असू शकतं?

29 डिसेंबरपासून वढु गावचं वातावरण तापलेलं आहे. गावात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आहे. गावातील दुकानं चार दिवसांपासून बंद आहे. गावकऱ्यांचे हाल तर सुरु आहेच पण त्यासोबत तेथे तैनात असलेल्या पोलिसांचेही हाल सुरु असल्याचं दिसून आलं. या गावाला तशी वादाची काही पार्श्वभूमी नाही. पण आज हेच गाव जातीयवादाची ओळख म्हणून समोर आलंय.

गेल्या काही दिवसांत आपल्याकडं जाती-धर्मात द्वेष पेरण्याचं काम काही पक्ष-संघटना उघड उघड करताना दिसत आहेत. हे काम फक्त वढू येथेच सुरु आहे असं नक्कीच नाही. अॅट्रोसिटी, आरक्षण, देशप्रेम या नावाखाली लोकांना भडकावून दलित आणि अल्पसंख्यांकाबाबत द्वेष पसरवला जात आहे. 

कोरेगाव भिमाची घटना महाराष्ट्राला लाजवणारी आहे; पण अशाच घटना येणाऱ्या काळातही घडू शकतात. त्यासाठी आपल्या आजूबाजूला द्वेष पेरण्याचं काम जोमानं सुरू आहेत. त्याकडे उघड्या डोळ्यांनी बघणं आणि ते वेळीच ते थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा हा द्वेष अशा दंगली पेटवण्याचं काम करतच राहील.

Web Title: Marathi News Koregaon Bhima Vadhu Budruk Maharashtra Riots Reportage