बारावीची आजपासून परीक्षा 

बारावीची आजपासून परीक्षा 

पुणे - विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय खुले करून देणारी बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता. 21) सुरू होत आहे. या वर्षी 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यातील दोन हजार 822 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी "हेल्पलाइन' आणि परीक्षेच्या काळात येणाऱ्या नैराश्‍यातून बाहेर पडण्यासाठी "ऑनलाइन समुपदेशन' राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुरू केले आहे. 

राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2018 मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होत आहे. राज्यातील आठ लाख 34 हजार 234 विद्यार्थी आणि सहा लाख 50 हजार 898 विद्यार्थिनी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी सुमारे नऊ हजार 486 कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून दोन हजार 822 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान तीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहनही मंडळाने केले आहे. 

बारावी परीक्षेच्या इंग्रजी विषयासाठी प्रचलित बहुसंची प्रश्‍नपत्रिका असणार आहे. अध्ययन अक्षम आणि ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थ्यांना गणित, पुस्तपालन आणि लेखाकर्म यासह विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षेसाठी कॅल्क्‍युलेटर वापरण्यास परवानगी आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार केले आहे. या परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरसाठी खंड ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके 
परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सात या प्रमाणे राज्यात एकूण 252 भरारी पथके नेमली आहेत. या शिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन केली आहे. विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथकेही असणार आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याची विनंती मंडळाने केली आहे. मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारीदेखील परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देणार आहेत. इंग्रजी आणि गणित या विषयांच्या परीक्षेच्या दिवशी "बैठे पथक' कार्यान्वित करण्याच्या सूचना विभागीय मंडळाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

ऑनलाइन समुपदेशन 
परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थी नकारात्मक विचार किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक विभागीय मंडळात प्रत्येकी एक या प्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. 

उत्तरपत्रिकेवर बारकोड 
उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर प्रथमच बारकोड छापण्यात आला आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिटावर (प्रवेश पत्र) या वर्षी प्रथमच मराठी आणि इंग्रजीतून सूचना दिल्या आहेत. 

"आउट ऑफ टर्न' 
वैद्यकीयदृष्ट्या किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षा देता आली नाही, तर त्यांना "आउट ऑफ टर्न'ने प्रविष्ट होता येईल. ही परीक्षा 21 आणि 22 मार्च दरम्यान विभागीय मंडळामार्फत जिल्हानिहाय केंद्रावर घेण्यात येणार आहे. 

व्यवसाय शिक्षणविषयक अभ्यासक्रमांतर्गत (एनएसक्‍यूएफ) यंदा 158 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 
- "माहिती तंत्रज्ञान' विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून या विषयासाठी एक लाख 20 हजार 756 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एक हजार 465 केंद्रांवरून ही परीक्षा होणार आहे. तसेच "सामान्यज्ञान' विषयाची परीक्षाही ऑनलाइन होत असून या विषयासाठी एक हजार 697 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 38 केंद्रांवरून ही परीक्षा होईल. 

विद्यार्थ्यांची शाखानिहाय संख्या 
शाखा - नोंदणी झालेले विद्यार्थी 
विज्ञान - 5,80,820 
कला - 4,79,863 
वाणिज्य - 3,66,756 
व्यावसायिक अभ्यासक्रम - 56,693 

* विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन - 
विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचण असल्यास त्यांना विभागीय मंडळाच्या हेल्पलाइनवर मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी 
राज्यस्तरीय क्रमांक - 020-25705271, 25705272 
विभागीय मंडळाचे क्रमांक - 
पुणे (020) 65292317, 
मुंबई (022) 27881075, 27893756, 
नाशिक (0253) 2592143 

विभागनिहाय विद्यार्थी संख्या - 

विभाग - एकूण विद्यार्थी 
पुणे - 2,45,055 
नागपूर - 1,72,409 
औरंगाबाद - 1,64,867 
मुंबई - 3,30,823 
कोल्हापूर - 1,29,949 
अमरावती - 1,52,595 
नाशिक - 1,68,220 
लातूर - 87,567 
कोकण -  33,647 
एकूण - 14,85,132 









 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com