पोटनिवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरवात ; मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी केले मतदान

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

सध्या विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 3, अपक्ष 7, एमआयएमचे 2 तर सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ आकडा पार करावा लागणार आहे. 

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोण विजयी होणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. विधानभवन येथील मध्यवर्ती सभागृहात या पोटनिवडणुकीच्या मतदानाला सकाळी नऊपासूनच उत्साहात सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सत्ताधारी भाजप, शिवसेनेसह विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष आमदारांनी मतदानासाठी सकाळीपासून विधानभवन परिसरात गर्दी केली. यातील बहुतेक मंत्री, आमदारांनी मतदान केले आहे. मतदान ४ वाजेपर्यंत चालणार असून, त्यानंतर लगेचच सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे.

या पोटनिवडणुकीसाठी भाजपने प्रसाद लाड यांना रिंगणात उतरवले तर काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याने लाड यांचे पारडे जड झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सध्या विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 3, अपक्ष 7, एमआयएमचे 2 तर सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ आकडा पार करावा लागणार आहे. 

दरम्यान, या पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, याचे चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

Web Title: marathi news maharashtra legislative council election vidhan parishad