मुख्यमंत्र्यांकडून बगल, तर विरोधकांचे मौन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - भगवे झेंडेधारी 300 तरुणांनी "त्या' दिवशी परिसरात "तमाशा' घातल्याचा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्र्यांनी करत एका विशिष्ठ संघटनेकडे निर्देश केले; मात्र त्या संघटनेचे नाव घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी तर शेवटपर्यंत टाळलेच. परंतु, या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजींच्या नावाने टीका करणाऱ्या विरोधकांनी सभागृहात मात्र अक्षरश: बोटचेपी भूमिका घेतली. ते 300 तरुण कोण होते, भिडे गुरुजींवरील कारवाईबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात मात्र अक्षरशः मौन बाळगले.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सरकारने आपला राजधर्म पाळला आणि व्यक्ती, जाती, धर्मनिरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई केली, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विशेष म्हणजे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ आणि परिसरात आवश्‍यक फौजफाटा देण्यात आला होता. दंगलीच्या दिवशी विजयस्तंभाजवळ अखंड मानवंदना सुरू होती, हे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, 'त्या दिवशी सकाळी साधारण 1200 भगवे झेंडेधारी युवक वढू येथील संभाजी महाराजांच्या समाधीला मानवंदना देण्यासाठी आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत या युवकांना मानवंदनेनंतर परत जाण्यास भाग पाडले.

मात्र, यातील 200 जणांनी आम्ही कोरेगाव भीमाचे रहिवासी असल्याचे सांगत सणसवाडी परिसरात दाखल झाले. वाहनतळावर तोडफोड करत घोषणाबाजीला सुरवात केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेकीला सुरवात झाली. पोलिसांनी या दोन्ही गटांना दूर केले. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या दरम्यान, झेंडेधारी तरुण कोणत्या संघटनेचे होते, कोणाच्या सांगण्यावरून ते दाखल झाले होते, भिडे गुरुजींवर काय कारवाई केली, असा कोणताच प्रश्न विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर उपस्थित केला नाही.

एकबोटेंसाठी पथके पाठवली होती
मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याच्या संदर्भात तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला. ते फरार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग आणि शोध मोहीम घेतली. उत्तर प्रदेशातही पथके पाठवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या जामीन अर्जांना विरोध केला. न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यांची कोठडीत चौकशी करायची असल्यानेच ताब्यात घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या कोठडीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी राज्य सरकार स्वत:च्या ताब्यात घेईल. त्याचे संरक्षण आणि संवर्धनाची व्यवस्था सरकार आपल्या हाती घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: marathi news maharashtra news chief minister politics congress ncp