धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमुल्यांकन: 54 लाखांचा मोबदला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सानुग्रह अनुदानासह 54 लाख रुपयांचा मोबदला देय असल्याबाबत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी बनविला आहे. तो सरकारला सादर करण्यात आला आहे. यापूर्वीचा पंचनामा रद्द करून रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरून फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. 

धुळे : भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी न्याय मिळत नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारे विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी (कै.) धर्मा मंगा पाटील आणि नरेंद्र धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमुल्यांकनाचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल ऊर्जा विभागाला सादर करण्यात आला असून, त्यांचा पाच एकर जमिनीसाठी 54 लाख रुपयांचा मोबदला देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सानुग्रह अनुदानासह 54 लाख रुपयांचा मोबदला देय असल्याबाबत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी बनविला आहे. तो सरकारला सादर करण्यात आला आहे. यापूर्वीचा पंचनामा रद्द करून रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरून फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांना 28,05,984 तर नरेंद्र पाटील यांना 26,42,148 रक्कमेचा मोबदला देण्याची शिफारस करण्यात आली आहे. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे. 

धर्मा पाटील यांना शंभर टक्के दिलासा रकमेसह आंब्याच्या 376 रोपांसाठी तीन लाख 41 हजार 402, तर प्रतिएकरी सहा लाखांच्या सानुग्रह अनुदानापोटी 24 लाख 64 हजार 582 असा एकूण 28 लाख 5 हजार 984 आणि नरेंद्र धर्मा पाटील यांनाही शंभर टक्के दिलासा रकमेसह आंब्याच्या 272 रोपांसाठी दोन लाख 46 हजार 976, तर प्रतिएकरी सहा लाखांच्या सानुग्रह अनुदानापोटी 23 लाख 95 हजार 172, असा एकूण 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला देय होऊ शकतो. पाटीलद्वयींना एकूण आंब्याच्या 648 रोपांसाठी पाच लाख 88 हजार 378 आणि सानुग्रह अनुदान म्हणून एकूण 48 लाख 59 हजार 754, असा एकंदर 54 लाख 48 हजार 132 रुपयांचा मोबदला देय होऊ शकतो. त्यात पूर्वी त्यांना चार लाख तीन हजार 445 रुपयांचा मोबदला अदा झाला असल्याने तो वगळता नव्याने 50 लाख 44 हजार 687 रुपयांचा मोबदला देय होऊ शकतो, असा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. 

Web Title: Marathi news Maharashtra news Dharma patil land Revaluation