राज्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेची एक पोटनिवडणूक होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे झालेले निधन आणि नाना पटोले यांनी दिलेला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनाम्यामुळे दोन ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक अपेक्षित आहे.

डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सदस्याच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे लोकसभा अथवा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्यास तेथे सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे दोन लोकसभा आणि एक विधानसभा मतदारसंघात येत्या मेपर्यंत किंवा जूनपर्यंत पोटनिवडणूक अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत लोकसभेत भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाना पटोले यांनी गेल्या वर्षी खासदारकीसह भाजपचा राजीनामा दिला. त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर पटोले हे कॉंग्रेसच्या चिन्हावर पोटनिवडणूक लढवण्याची शक्‍यता आहे. भाजपचे पालघरचे खासदार ऍड. चिंतामण वनगा यांचे 30 जानेवारी रोजी नवी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पालघरची जागा रिक्त झाली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून भंडारा-गोंदियासह पालघर लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेतली जाईल. पालघरच्या जागेसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या नावाची चर्चा आहे.

Web Title: marathi news maharashtra news loksabha vidhansabha by election