राज्यसभेची निवडणूक बिनविरोध

Vidhan-Bhavan
Vidhan-Bhavan

मुंबई, नवी दिल्ली - राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आज रात्री स्पष्ट झाले. भाजपतर्फे नारायण राणेंबरोबरच केरळचे व्ही. मुरलीधरन यांना; तर कॉंग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्यसभेतील 58 जागा रिक्‍त होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता, सहा जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. भाजपचे तिन्ही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि केरळमधील व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहे. जावडेकर यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून, राणे आणि मुरलीधरन उद्या अर्ज दाखल करतील.

विधानसभेतील संख्याबळानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने वंदना चव्हाण; तर शिवसेनेने अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली आहे. कॉंग्रेसने आज ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची उमेदवारी जाहीर केली.

राज्यसभेसाठी गुप्त मतदान होत नाही. हात उंचावून मतदान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी दोन जागा रिक्‍त होत असताना त्यांनी प्रत्येकी एकच उमेदवार देण्याचे निश्‍चित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेच्या सहाही जागा बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले. उद्या याबाबत अधिकृत घोषणा होईल.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांच्या घोषणेबाबत कमालीची गुप्तता पाळणाऱ्या सत्तारूढ भाजपने आज राज्यसभेच्या उर्वरित 18 जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले. महाराष्ट्रातून नारायण राणे यांचे नाव अपेक्षेप्रमाणे यात आहे. त्याचबरोबर केरळचे व्ही. मुरलीधरन यांनाही महाराष्ट्रातूनच लादले जाणार आहे. याशिवाय आजच्या यादीत महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज जैन (छत्तीसगड), माध्यमप्रमुख अनिल बलुनी (उत्तराखंड), प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव व अशोक वाजपेयी (उत्तर प्रदेश) ही काही प्रसिद्ध नावे आहेत. या यादीत तरुण उमेदवारांना झुकते माप देण्यात आले आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत जाट नेते किरोडीलाल मीणा व मदनलाल सैनी (राजस्थान), लेप्ट. जनरल डी. पी. वत्स (हरियाना), अजयप्रताप सिंह व कैलास सोनी (मध्य प्रदेश), राजीव चंद्रशेखर (कर्नाटक), समीर उन्नाव (झारखंड), अशोक वाजपेयी, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, श्रीमती कांता करदम, डॉ. जेन, नरसिंह राव व हरनाथसिंह यादव (सर्व उत्तर प्रदेश) यांची नावे आहेत. या यादीवर नजर टाकली तर या ज्येष्ठांच्या सभागृहात सत्तारूढ बाकांवर तरुण खासदारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे जाणवते. डॉ. अनिल जैन (वय 46), जी. व्ही. एल. नरसिंह राव, सोनी व माध्यम प्रमुख अनिल बलुनी (43 ते 48) महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे (49) आदी नावे पन्नाशीच्या आतल्या नेत्यांची आहेत.

महाराष्ट्रातील उमेदवार
भाजप - प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन
शिवसेना - अनिल देसाई
राष्ट्रवादी कॉंग्रेस - वंदना चव्हाण
कॉंग्रेस - कुमार केतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com