राज्यसभेसाठी सात उमेदवार; भाजपकडून विजया रहाटकर रिंगणात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. भाजपने मात्र तीन जागांसाठी चौथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सध्यातरी एका उमेदवाराचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. उद्या (ता. 13) छाननी असून अर्जमाघारीची तारीख 15 आहे. 23 तारखेला मतदान होईल.

या सहाही जागांसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत. तसेच प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान 42 मतांची आवश्‍यकता लागणार आहे. यापैकी कॉंग्रेसकडे 42 आमदार आहेत. मात्र, कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले, तर नीतेश राणे, कालिदास कोळंबकर हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार असूनही त्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील याचा कोणताही भरवसा नाही. त्यामुळे कॉंग्रसकडे फक्त 39 मते शिल्लक राहतात. त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार कुमार केतकर यांना विजयासाठी तीन मते कमी पडत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची सारी भिस्त ही अपक्ष आमदार व छोट्या पक्षांच्या आमदारांवर राहणार आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेत 41 सदस्य असून त्यांच्या उमेदवार वंदना चव्हाण आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि बंडखोर आमदार रमेश कदम हे दोघेही तुरुंगात आहेत. यापैकी भुजबळांची तब्येत ठीक नसल्याने ते राज्यसभेसाठी मतदान करतील की नाही याबाबत शंका आहे. रमेश कदम हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारला मतदान करतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही तीन मतांची जुळवाजळव करावी लागणार आहे.

याउलट शिवसेनेचे विधानसभेत 63 आमदार असून, त्यांच्याकडून फक्त अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे 42 मते मिळून ते सहजी विजयी होणार आहेत. शिवसेनेकडे 21 अतिरिक्त मते असून ती मते कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

भाजपचे 122 आमदार सभागृहात आहेत. त्यामुळे भाजपने उभे केलेले उमेदवार प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन हे उमेदवार सहज विजयी होणार आहेत. तरीही शिवसेनेची अतिरिक्त मते आणि अपक्षांची आठ ते दहा मते मिळून भाजपचा चौथा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो.

याबाबत कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की पतंगराव कदम यांच्या निधनामुळे मतांचा कोटा कमी झालेला आहे. आता कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी 42 मतांची आवश्‍यकता लागणार आहे. कॉंग्रेसने आपल्या उमेदवारासाठी छोट्या पक्षांच्या मदतीने मतांची पुरेशी बेगमी केली असून कुमार केतकर हे सहज विजयी होतील, अशी आशाही व्यक्त केली.

निवडणुकीच्या आखाड्यात...
- विजयासाठी आवश्‍यक मते - 42
- भाजप - 122 मते
- शिवसेना - 63 मते
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 41 मते
- कॉंग्रेस - 39 मते

Web Title: marathi news maharashtra news rajyasabha election politics vijaya rahatkar