संभाजी भिडेंना अटक न केल्यास मुंबईत मोर्चा - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या कटात मिलिंद एकबोटे यांच्यासह संभाजी भिडेही सहभागी होते. त्यामुळे भिडेंनाही 26 तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा कोरेगाव भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (ता. 15) दिला. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बंद केलेल्या शिष्यवृत्ती सुरू करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर गुरुवारी विधान भवनात गेले होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. भिडेंनाही अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचारावरील चर्चेला दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. या उत्तरादरम्यान संभाजी भिडेंबाबत सोईस्कर मौन बाळगणाऱ्या विरोधकांनी गुरुवारी अचानक भिडे यांना अटक करावी, अशी मागणी करत विधान परिषदेत गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, जयदेव गायकवाड यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत चर्चेची मागणी केली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. दोन दिवसांपूर्वी सभागृहात कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी चर्चा झाली होती. या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले होते. त्यामुळे या मुद्द्यावर पुन्हा चर्चा घेता येणार नाही, असे सभापतींनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news maharashtra news sambhaji bhide rally crime prakash ambedkar