लाखो मुले आज रमणार रंगरेषांच्या विश्‍वात 

representational image
representational image

पुणे : सातपुड्याच्या डोंगररांगांपासून ते पश्‍चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या आणि शेजारच्या गोव्यातल्या जवळपास दोन हजार शाळा 'सकाळ चित्रकला स्पर्धे'त सहभागी होऊन, आपल्या मनात उमलणाऱ्या रंगांना प्रत्यक्ष कागदावर उतरवण्यासाठी आसुसलेल्या सर्जनशील मनांच्या स्वागताकरिता सज्ज झाल्या आहेत. 

महानगरांपासून ते डोंगरकपाऱ्यांतल्या खेड्यापाड्यांपर्यंत चित्रकला स्पर्धेचे सर्व साहित्य पोचले आहे आणि 32व्या 'सकाळ चित्रकला स्पर्धे'ची लगबग सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या देशातल्या या सर्वांत मोठ्या चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी चित्रकार प्रत्यक्ष सहभाग नोंदवत आहेत; तर देशातल्या अन्य राज्यांसह जगाच्या अनेक भागांतले विद्यार्थी ऑनलाइन स्पर्धेत सहभागी होत आहेत. 

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा सकाळी 9.00 वाजता, तर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा त्यानंतर लगेचच म्हणजे सकाळी 11.30 वाजता सुरू होत आहे. 

शाळेद्वारे स्पर्धेत नावनोंदणी न करता आलेल्या मुला- मुलींनाही आपल्या जवळच्या स्पर्धा केंद्रावर जाऊन तीन पिढ्यांतील 'सकाळ'च्या वाचकांना जोडणाऱ्या या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. 

महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून साठहून अधिक आदिवासी आश्रमशाळा आणि पन्नासहून अधिक विशेष मुलांसाठीच्या शाळाही या स्पर्धेत सहभागी होत आहेत. 

यंदाची स्पर्धा 'पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी' असून, श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टून्स सहप्रायोजक, भारताचे अग्रगण्य ऑप्टिशियन्स गंगर आयनेशन आयकेअर पार्टनर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पार्टनर, तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर आहेत. 
'चित्र रेखाटा, रंग भरा, कल्पनेच्या पंखांनी उंच भरारी घ्या', असे सांगत विद्यार्थी कलाकारांना रंग-रेषांच्या दुनियेची दारे खुली करून देणारी ही विद्यार्थिप्रिय स्पर्धा हा 'सकाळ'च्या वतीने मुलांसाठी होत असलेल्या उपक्रमांमधील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना 'सकाळ' सातत्याने राबवत आहे. 'मुले हेच आपले भविष्य आहे', हा 'सकाळ'च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने 'सकाळ'तर्फे मुलांसाठी 'सकाळ एनआयई'सारख्या प्रकाशनांबरोबर 'सकाळ यंगबझ' सारखे अनेक उपक्रमही होत असतात. 

स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद 'सकाळ'तर्फे विनामूल्य दिला जाईल. मात्र, स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्यासोबत आणावयाचे आहे. स्पर्धा केंद्रांचा सविस्तर तपशील 'सकाळ'मधून याआधीच प्रसिद्ध झाला आहे. 

स्पर्धेचा निकाल जानेवारी 2018 मध्ये प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर राज्यपातळीवरील, तसेच पुणे विभागीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र आणि गोव्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. 
 

चार गटांत स्पर्धा 

  • 'गट अ' - इयत्ता पहिली व दुसरी 
  • 'गट ब' - इयत्ता तिसरी व चौथी 
  • 'गट क' - इयत्ता पाचवी ते सातवी 
  • 'गट ड' - इयत्ता आठवी ते दहावी 

वेळ :

  • 'अ' व 'ब' गटांसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 
  • 'क' व 'ड' गटांसाठी सकाळी 9.00 ते 10.30 

प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी राज्यपातळीवर 2,500 रुपयांचा प्रथम, 2 हजार रुपयांचा द्वितीय, 1,500 रुपयांचा तृतीय आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचे पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील. विभाग पातळीवर एक हजार रुपयांचा प्रथम, 750 रुपयांचा द्वितीय, 500 रुपयांचा तृतीय आणि प्रत्येकी 250 रुपयांचे पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील; तर केंद्र पातळीवर 100 रुपयांचा प्रथम, 75 रुपयांचा द्वितीय, 50 रुपयांचा तृतीय पुरस्कार आणि पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रे देण्यात येतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com