संजय राऊत मूर्ख माणूस; आमच्या नादाला लागू नको!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन राज्य केले. तुम्ही मात्र तसे नाहीत. तुम्ही (शिवसेनेने) आजपर्यंत धर्मासाठी कोणते काम केले ते सांगा. धर्मासाठी त्याग करावा लागतो. तुम्ही फुकटची बडबड करता. शिवसेना हा काही आमचा शत्रू नाही. मात्र संजय राऊत यांच्यासारखा माणूस विष कालविण्याचे काम करीत आहे. गुटखा खाऊन कोणी जर इशारे देत असेल तर तो नेता होऊ शकत नाही.

पुणे : ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांनी मुंबईवर राज्य केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण, हा संजय राऊत एक मूर्ख माणूस आहे. एका जैन मुनीला जोकर म्हणताना, अतिरेकी आणि ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाला लाज कशी नाही वाटली. तुझ्या आईने तुझ्यावर संस्कार केले नाहीत का, असा संतप्त सवाल जैन मुनी आचार्य सूरसागर यांनी केला. 

'मुंबई काय तुमच्या मालकीची आहे का ? खबरदार, जर आमच्या वाट्याला जाल तर ! ' हमको छेडो गे, तो हम तुमको छोडेंगे नही' असा गंभीर इशारा सूरसागर यांनी यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना आज गुजरातमधून दिला. 

राज्यातील राजकारणाची बित्तंबातमी वाचण्यासाठी क्लिक करा

संजय राऊत यांनी काल (बुधवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मीरा भाईंदर महापालिकेत भाजपने मिळविलेला विजय हा 'मुनी आणि मनी'मुळे होता. जैन मुनी हा अतिरेकी असून त्याला ठेचला पाहिजे असे खळबळजनक वक्तव्य केले होते. 

राऊत यांच्या या वक्तव्याचे पडसाद जैन समाजात उमटले आहेत. राऊत यांचा सर्वत्र निषेध केला जात आहे. तसेच भाजपच्या मंडळींनी त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करताना दोन खडे बोलही सुनावले आहेत. आज राऊत यांना त्यांच्याच भाषेत जैन मुनींनीही सडेतोड उत्तर दिले असून तसा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये जैन मुनीने थेट संजय राऊत आणि शिवसेनेला शिंगावर घेतानाच धडा शिकविण्याची भाषा केली आहे. जैन मुनींनी आपल्या भाषणात सुरवात करताना म्हटले आहे, '' संजय राऊत हा मुंबईवर राज्य करायला निघाला आहे. अरे मुर्खांनो, मुंबई काय तुमच्या मालकीची आहे का? ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीमहाराज, संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम यांची आहे. तुमची नाही. जो धर्म अहिंसेचा पुजारी आहे. त्या जैन समाजातील लोकांच्या मंदिरासमोर मांस शिजवून खाताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तुमच्यात जर इतकी हिम्मत असेल तर मशिदीसमोर डुक्कर टाकू शकता का? तुम्ही भेकड आहात. आम्ही शांतताप्रिय आहोत याचा अर्थ आम्ही नेभळट नाही. आम्ही भगतसिंग, सुखदेव, राजगुरूला माननारे आहोत. 'जैन को बनिया न समजो. संपूर्ण देशात सर्वाधिक इन्कम टॅक्‍स भरणारे जैन आहेत हे लक्षात घ्या. तुम्हाला संपवायला आम्हाला वेळ लागणार नाही.'' 

''भगवान महावीरांनी आम्हाला शांतीचा संदेश दिला. 'अहिंसा परमो धर्मो'चे आम्ही पुजारी आहोत. मात्र आम्ही भेकड नाही हे संजय राऊतने प्रथम लक्षात घ्यायला हवे. जर आमच्यामुळे भाजपला विजय मिळाला असेल तर तुम्ही यापूर्वी जे विजय मिळविले ते काय गुंडागर्दी आणि तलवारीच्या धाकावर मिळविले का ? असा सवाल त्यांनी केला. 

''छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन राज्य केले. तुम्ही मात्र तसे नाहीत. तुम्ही (शिवसेनेने) आजपर्यंत धर्मासाठी कोणते काम केले ते सांगा. धर्मासाठी त्याग करावा लागतो. तुम्ही फुकटची बडबड करता. हा देश साधूसंतामुळेच आज जिवंत आहे. हे लक्षात घ्या. हा देश आर्य चाणक्‍यांचा आहे. शिवसेना हा काही आमचा शत्रू नाही. मात्र संजय राऊत यांच्यासारखा माणूस विष कालविण्याचे काम करीत आहे. वर स्वर्गात बाळासाहेब हा तमाशा पाहत असतील. त्यांना किती वाईट वाटत असेल. ते खाली येऊ शकले असते तर संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला प्रथम ठेचला असता. गुटखा खाऊन कोणी जर इशारे देत असेल तर तो नेता होऊ शकत नाही,'' अशा जहाल शब्दांत त्यांनी टीका केली. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्यावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा एक शिवसेनेच्या शंभर शिवसेना बनतील हे लक्षात घ्यावे. तुम्ही झाकीर नाईकचे काही वाकडे करू शकला नाही तर आमचे काय करणार आहात. तुमची हिम्मत असेल तर मुंबईच्या बाहेर पडून गुजरातमध्ये पाय ठेवून बघा म्हणजे आम्ही कोण आहोत हे कळेल असे थेट आव्हानही त्यांनी शेवटी शिवसेनेला दिले आहे.

Web Title: marathi news marathi websites Sanjay Raut Jain Shiv Sena BJP