परिचारकांचे निलंबन रद्द करण्यावरून शिवसेना आक्रमक

सोमवार, 5 मार्च 2018

प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीवर शिवसेना सदस्यांनी आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. 

मुंबई : विधानसभेत आज कामकाजाला सुरवात होताच शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले होते. विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याच्या मुद्यावर शिवसेना सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ केल्याने कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.

प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीवर शिवसेना सदस्यांनी आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली होती. त्यामुळे आजचे कामकाज वादळी होण्याची चिन्हे दिसत होती. विधानसभेत आजच्या सहाव्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच शिवसेनेच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरत घोषणा देण्यास सुरवात केली. यावळी प्रशांत परिचारक यांच्या निषेधाचा फलक शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत फडकावला. सत्ताधारीच वेलमध्ये उतरल्याने अध्यक्षांनी कामकाज पंधरा मिनीटांसाठी कामकाज तहकुब केले.

त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्यांनी परिचारकांचे निलंबन करा, जय जवान जय किसान, भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. 

यावेळी शिवसेना सदस्यांच्या मागणीला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "आमदार परिचारांचा निलबंन रद्द करण्याचा विषय महत्वाचा आहे. परिचारकांनी सैनिकांचा अवमान करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की परिचारकांचे कायमस्वरूपी निलंबन करा.

परिचारकांनी सैनिकांचा अवमान केला असल्याने अनेक माजी सैनिकांनी आमच्याकडे तिव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यावर निलबंनाची कारवाई मागे घेणे हा सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे प्रशांत परिचारकांचे कायम स्वरूपी निलंबन करावे, अशी मागणी विखे पाटील यांनी लावून धरली. 

यावेळी सदस्यांचा गोंधळ सुरूच होता. त्यावेळी निवेदन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबाबत एकमताने वरच्या सभागृहात ठराव मंजूर झाला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीत धनंजय मुंडे, नीलम गोऱहे आणि काँग्रेसकडून नारायण राणे होते. त्या समितीने निलंबन रद्द करण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला आहे. या समितीच्या शिफारस वरून निलबंन रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला होता. समितीने जो निर्णय जो दिला, त्यात राष्ट्रवादीचो धनंजय मुंडे आहेत. त्यावेळी काँग्रेसचे सदस्य असलेले राणे ही आहेत तर शिवसेनेच्या निलमताईही आहेत, हे लक्षात घ्या !" 

मात्र प्रशांत परिचारकाच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून गोंधळ वाढल्याने विधानसभेचे कामकाज आर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.

Web Title: Marathi news mumbai news prashant paricharak cancellation suspension shivsens aggressive