कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय

kopardi
kopardi

देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते. 

या निकालामुळे पीडितेला अखेर न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. 

निकालाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालय व परिसरात सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील तिन्ही दोषींना आज सकाळी न्यायालयाच्या मागील दरवाज्यातून आत आणण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालय कक्षात खचाखच गर्दी होती. पीडीतेचे नातेवाईक, माध्यम प्रतिनिधी, वकीलांनी न्यायालय कक्ष पूर्ण भरून गेला होता. साध्या वेशातील पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

कोपर्डी (ता. कर्जत) येथेही चाळीस पोलिसांसह राज्य राखीव व शीघ्र कृती दलाचे पथक तळ ठोकून आहेत. नगर शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील सगळ्याच भागांत पोलिसांचा पहारा आहे. 

कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झाला होता. या खटल्यातील दोषी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिघांही फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती, तर आरोपीचे वकील ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे व अॅड. प्रकाश आहेर यांनी कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती.

आरोपींना काय शिक्षा सुनावली जाणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. अखेर या नराधमांना शिक्षा सुनाविण्यात आली. त्यांना फाशी देण्याची पीडितेच्या कुटुंबीयांचीही मागणी होती.  

शिक्षा दिली जाणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी न्यायालय, नगर शहर व कोपर्डीतही मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले. 

असा आहे न्यायालय, कोपर्डीत बंदोबस्त

  • न्यायालयाच्या आवारात पोलिस उपअधीक्षकावर बंदोबस्ताची जबाबदारी होती.
  • न्यायालयाच्या परिसरात चार सहायक पोलिस निरीक्षक, 75 पोलिस कर्मचारी, दहा महिला पोलिस कर्मचारी, प्रत्येकी वीस पोलिस असलेले शीघ्र कृती दलाची दोन पथके व दंगल नियंत्रक पथक, राज्य राखीव दलाचे पथक तैनात आहेत.
  • निकालानंतर शहरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी 'फिक्‍स पॉइंट' लावले आहेत.
  • निकालानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शहरात एक शीघ्र कृती दलाचे पथक फिरते आहे.
  • न्यायालयाच्या परिसरात वकील, न्यायाधीश, पोलिस आणि नागरिकांच्या वाहनांसाठी न्यायालयासमोर स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था आहे. त्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
  • न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धकाची व्यवस्था करण्यात आली होती. नियंत्रण कक्षातही वीस कर्मचारी राखीव उपस्थित आहेत.
  • न्यायालय परिसरात निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर परिसराची बाँबशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली.

काय आहे कोपर्डी प्रकरण?
कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली असता जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात पीडितेचे दोन्ही हात मोडले होते. 

पीडितेच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर चार दिवसांनी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अटक करण्यात आली.

न्यायालयाने तिन्ही आरोपींविरुद्ध कट रचून अत्याचार व खून केल्याचा आरोप ठेवला. या खटल्यात 31 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, पीडितेच्या मैत्रिणी, चुलत आजोबा यांच्या साक्षी महत्त्वाच्या  ठरल्या. सरकार पक्षाने 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात मांडली आणि ती सिद्ध केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपीला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com