कांदाप्रश्नाचा चेंडू केंद्राच्या दरबारी,सदाभाऊ भेटणार केंद्रीय कृषीमंत्र्यांना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नाशिक : नवीन लाल कांदा विक्रीसाठी येत असताना, अद्यापही जिल्ह्यात सुमारे 15 लाख क्विंटल उन्हाळ कांदा विक्री न झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून 200 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यात अधिक सुधारणा करतानाच, केंद्राकडे निर्यात अनुदान 5 टक्‍क्‍यांपेक्षा 10 टक्के करावे आणि आगामी तीन महिन्यांसाठी ते 15 टक्के करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

नाशिक : नवीन लाल कांदा विक्रीसाठी येत असताना, अद्यापही जिल्ह्यात सुमारे 15 लाख क्विंटल उन्हाळ कांदा विक्री न झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून 200 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यात अधिक सुधारणा करतानाच, केंद्राकडे निर्यात अनुदान 5 टक्‍क्‍यांपेक्षा 10 टक्के करावे आणि आगामी तीन महिन्यांसाठी ते 15 टक्के करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांसह महाराष्ट्र शासनाचे संयुक्त शिष्ठमंडळ लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी जाणार असल्याचे राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 
    कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीसंदर्भात आज नाशिकच्या विश्रामगृहावर राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे सभापती, सचिव आणि कांदा व्यापाऱ्यांची बैठक मंगळवारी रात्री उशिरा पार पडली. यावेळी नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे, संचालक संपतराव सकाळे, पंढरीनाथ थोरे, चांदवडचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, सिन्नरचे सभापती विनायक तांबे, लासलगावचे ललित दरेकर, पिंपळगाव बसंवतचे संजय पाटील, कांदा व्यापारी बबलू शेठ, हिरामण परदेशी, उपनिबंधक गौतम बलसाने, सचिव अरुण काळे आदींसह पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. 
 

या  बैठकीत जिल्ह्यातील कांद्याची सध्याची स्थिती व साठवणूक असलेला कांदा आणि येणाऱ्या नवीन कांद्याची माहिती श्री. खोत यांनी बाजार समितीचे सभापतींकडून घेतली. तर सध्या कांद्याची देश-परदेशात कांद्याला असलेली मागणी जाणून घेतली. त्यावर व्यापाऱ्यांनी बांगलादेशात येत्या आठवडाभरात सार्वत्रिक निवडणूका असल्याने कांद्याची निर्यात ठप्प होणार आहे. त्याचा परिणाम उन्हाळी कांद्याच्या दरावर होणार आहे. तर देशांतर्गत बाजारात उन्हाळ कांद्याला उठाव नसल्याचे सांगितले. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून निर्यात दर आणि अनुदान दरात वाढ करावी, 15 डिसेंबरच्या मुदतीमध्ये एका महिन्यांची वाढ करण्याची मागणी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

बैठकीतील निर्णय 
* कांदा उत्पादक शेतकऱ्याचा सातबारा कोणाच्याही नावे असला तरी कुटूंबातील शेतकरी, त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, बहिण यांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी अध्यादेशात सुधारणा तात्काळ केली जाणार. 
* निर्यात अनुदान 5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के आणि येत्या तीन महिन्यांसाठी ते 15 टक्के करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे देणार. त्यामुळे कांद्याची दरवाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार. 
* कांद्याचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती पदाधिकारी, कांदा व्यापारी यांचे संयुक्त शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार. 
* 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान उन्हाळ कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या मुदतीमध्ये महिनाभराची वाढ केली जाणार. 

उन्हाळ कांद्याचे उत्पादन वाढले तसे त्याची विक्रीची बाजारपेठ कमी झाली. त्यामुळे भाव घसरले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तातडीने निर्णय घेण्यासाठी केंद्राकडेही अनुदानाची मागणी करणार. 
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री, महाराष्ट्र. 

Web Title: marathi news onion problem