दिलखुलास नेता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

भिलवडी-कडेगाव ते पुणे-दिल्लीपर्यंतचा भारती विद्यापीठाचा मोठा पसारा ज्यांनी अनुभवला आहे त्यांना भारती परिवाराची म्हणून काही वैशिष्टे जाणवली असतील. शिपायाच्या डोईवरची गांधी टोपी किंवा तिथला सर्व स्टाफ हा आपला...गावाकडचा वाटतो. पिढीजात दारिद्रय वाट्याला आलेले, दुष्काळ आणि निसर्गाच्या आपत्तीच्या सतत झळा सोसलेल्या, कष्टकरी कुटुंबातून मोठ्या जिद्दीने शिक्षण घेत शिकलेल्या हजारो मुलांना भारती विद्यापाठीने शिक्षणाचा प्रकाश दिला. त्यांची आयुष्ये उजळून निघाली. कित्येक पिढ्या ज्यांचे राहणीमान बदलले नाही अशा लाखो कुटुुंबांचे राहणीमान बदलून गेले....

भिलवडी-कडेगाव ते पुणे-दिल्लीपर्यंतचा भारती विद्यापीठाचा मोठा पसारा ज्यांनी अनुभवला आहे त्यांना भारती परिवाराची म्हणून काही वैशिष्टे जाणवली असतील. शिपायाच्या डोईवरची गांधी टोपी किंवा तिथला सर्व स्टाफ हा आपला...गावाकडचा वाटतो. पिढीजात दारिद्रय वाट्याला आलेले, दुष्काळ आणि निसर्गाच्या आपत्तीच्या सतत झळा सोसलेल्या, कष्टकरी कुटुंबातून मोठ्या जिद्दीने शिक्षण घेत शिकलेल्या हजारो मुलांना भारती विद्यापाठीने शिक्षणाचा प्रकाश दिला. त्यांची आयुष्ये उजळून निघाली. कित्येक पिढ्या ज्यांचे राहणीमान बदलले नाही अशा लाखो कुटुुंबांचे राहणीमान बदलून गेले.... ते सारे झाले पतंगरावांनी उभ्या केलेल्या संस्थांच्या परिस्पर्शाने. 

साठ वर्षापुर्वीच्या एका कोरडवाहू शेतकरी कुटुंबाचा दहा मुलांच्या संसाराची अवस्था काय असेल हे सांगण्यासाठी ऐतिहासिक साहित्यसामुग्रीचा अभ्यासाची गरज नाही. स्वातंत्र्यापुर्वीचा संपुर्ण भारतच अशा दैन्य-दारिद्रयात जगत होता. मात्र त्या परस्थितीतून बाहेर पडून आपण, आपले कुटुंब आणि आपला परिसर बदलला पाहिजे असा ध्यास घ्यायची उर्मी विशी पंचविशीच्या तरुणाच्या मनात येणे ही गोष्ट दुर्मिळच. एरवी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून त्यांचे आयुष्य चारचौघासारखे चांगलेच गेले असते. मात्र विद्येच्या माहेरघरात... पंडितांच्या गल्लीत सदाशिवपेठेत स्वतःची शिक्षणसंस्था काढावी, तिला भारती विद्यापीठ असे नाव द्यावे असे वाटण्यासाठीच मुळी भरारी घेण्याचे अंगभूत बळ असणारा पिंड असावा लागतो. संधी मिळाली की आपल्या माणसांसाठी भरभरून केले पाहिजे हे ब्रीद नेहमीच पतंगरावांनी ठेवले. वसंतदादांच्या सहवासातून त्यांनी ही गोष्ट घेतली होती. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते यांच्यासारख्या महाराष्ट्राचे शिल्पकारांकडून त्यांनी संस्थात्मक कार्याचे बळ जाणले होते.  

१९८५ पासून दोन वेळचा पराभवाचा (पाच वर्षाची एकच टर्म) अपवाद वगळता पतंगराव नेहमीच विधानसभेत राहिले. आमदार म्हणून आणि पुढे आघाडी शासनाच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी सर्व टॉपची आणि साधारणही अशी दोन्ही प्रकारची खाती सांभाळली. भावी मुख्यमंत्री म्हणून ते जाहीरपणे मोकळेपणाने स्वतःचा उल्लेख करायचे. कधी कधी त्यांच्या "या' पदाबद्दल पक्ष आणि पक्षाबाहेरच्या मंडळींकडून खोचकपणे टिकाटिपणी करायचे. मात्र त्यांनी ती कधी मनावर घेतली नाही. पतंगरावाच्या यशाचे मोजमाप त्यांनी किती पदे भूषवली, किती संस्था उभ्या केल्या यापेक्षा त्यांनी ज्या परस्थितीतीतून त्या केल्या या फुटपुट्टीवर झाले पाहिजे. पतंगरावांनी संस्था उभ्या करताना त्यासाठी रात्रीचा दिवस केला. सत्ता नसतानाही त्यांनी मंत्रालयाचे उबरंठे झिजवले आणि सत्ता असतानाही मंत्रिपदाचा मिजास न करता स्वतः फायली घेऊन ते सहकारी मंत्र्यांच्या...सचिवाच्या दारात जाऊन हक्काने फाईल क्‍लिअर करण्यासाठी गेले. तोच मोकळेपणा त्यांनी एखाद्याचे काम करतानाही दाखवला. पालकमंत्रीपदाच्या पंधरा वर्षाच्या काळात त्यांनी आपले निवासस्थानच कार्यालय केले. अधिकाऱ्यांना सकाळपासून त्यांना बंगल्यावर हजेरी लावायला लागे. लोकांची कामे होणे महत्वाची..तिथे प्रोटोकॉल उपयोगाचा नाही असं त्यांचं त्यावरचं मत ते जाहीरपणे मांडायचे. पतंगरावांनी माणसे उभी केली आणि कोसळलेल्या माणसांचेही आधारवड झाले. प्रत्येक गोष्ट जाहीरपणे बोलणाऱ्या पतंगरावांनी त्याबद्दल मात्र नेहमी मौन पाळले. मंगला बनसोडे, नामदेव ढसाळ, काळू-बाळू, सिंधूताई संकपाळ अशा किती तरी जनमानसातील परिचितांसाठी पतंगराव अज्ञात असे आधारवड राहिले आहेत. फी सवलतीसाठी येणारे शेकडो विद्यार्थी त्यांना जाहीर सभासमारंभात गाठत. तो पोर कोण कुठला याची आस्थेने खांद्यावर हात टाकून चौकशी करणारे पतंगराव नेहमी दिसत. त्याच्या अर्जावर पतंगरावांची सही झाली की त्याचे काम झालेले असे. 

पतंगराव ज्या कालखंडात घडले तो कालखंड आता संपला आहे. सर्व क्षेत्रांपुढे नवी आव्हाने आहेत. राजकारणातला दिलदारपणा...मोकळेपणा लुप्त होत आहे. ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षणाची निकडही आता वेगळ्या स्वरुपात पुढे येत आहे. शिक्षण क्षेत्रापुढे आव्हाने तर जागतिक झाली आहेत. शब्दाला जागणारे कार्यकर्ते आता दुर्मिळ झाले आहेत. मी आणि माझे कुटुंब आणि त्यासाठी राजकारण यात कुणालाच वावगे वाटत नाही. अशा कालखंडात पतंगरावांसारखी व्यक्तीमत्वे वेगळी आणि उठून दिसणारी. मातीशी नाते सांगणारी.... आईपुढे मोकळं व्हावं तशी समाजापुढे मोकळी होणारे पतंगराव आता दिसणार नाहीत. त्यांच्या अस्सल गावरान वक्तृत्वाचा फड आता रंगणार नाही. औंदूबरच्या डोहाला साक्षी ठेवून कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ आता फुटला तरी तरी तिथे रंगणारी पतंगराव आणि आर. आर. पाटील यांच्या रसरशीत वक्तृत्वाची मैफल दिसणार नाही. त्या दोघांनी नेहमीच एकमेकांचा "बंधु' असा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील हे दोघे ज्येष्ठ आणि कनिष्ठ बंधू आता आपल्यात नाहीत. कनिष्ठ बंधू आधी गेला आता ज्येष्ठ. राज्याच्या राजकीय अवकाशात या दोन ताऱ्यांचे नसणे सांगलीला पुढची अनेक वर्षे सतत जाणवत राहील. 

Web Title: marathi news patangrao kadam congress