मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान: विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मराठी भाषा दिनानिमित्त आज राज्य सरकारने सर्व आमदारांना दि.मा. प्रभुदेसाई यांचे 'महाराष्ट्र-गीत गाथा' हे पुस्तक वितरित केले. या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र व आतील पानावर मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा देणारा शिक्का मारण्यात आलेला होता.

मुंबई : नेमका मराठी भाषा दिनाचाच 'मुहूर्त'साधून जालना जिल्ह्यातील एक मराठी शाळा बंद करण्याबाबतचे सरकारी फर्मान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात सादर करून मराठीबाबत सरकारचा कळवळा बेगडी असल्याचा ठपका ठेवला.

विधीमंडळातील मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातील सावळ्या गोंधळावर विरोधी पक्षांनी आज सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या दरम्यान, विखे पाटील यांनी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मौजे शिवाची वाडी, कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा मुद्दा उपस्थित केला. गटविकास अधिकारी, बदनापूर, जि. जालना यांनी या शाळेच्या शिक्षकाला पाठविलेली शिस्तभंगाची नोटीस त्यांनी सभागृहाला दाखवली. सदरहू शाळा २७ फेब्रुवारीपर्यंत बंद करा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी या नोटीसमधून देण्यात आल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही शाळा समायोजनातील असल्याचे सांगितले. परंतु, विखे पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांचा युक्तिवाद योग्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शाळेत एक विद्यार्थी असेल तरी ती शाळा सुरू ठेवली पाहिजे. मराठी भाषेबाबत इतकी कमालीची अनास्था असलेल्या या सरकारला मराठी भाषा दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार असू शकत नाही, अशीही टीका त्यांनी केली. दरम्यान, याच विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात दहावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

मराठी भाषा दिनानिमित्त आज राज्य सरकारने सर्व आमदारांना दि.मा. प्रभुदेसाई यांचे 'महाराष्ट्र-गीत गाथा' हे पुस्तक वितरित केले. या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र व आतील पानावर मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा देणारा शिक्का मारण्यात आलेला होता. परंतु, शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले मुखपृष्ठ आणि तावडे यांचा शुभेच्छा संदेश उलटासुलटा झालेला होता. त्यामुळे हा शिवाजी महाराजांचा अवमान असल्याचे सांगून विखे पाटील यांनी ते पुस्तक विधानसभा अध्यक्षांना दाखवले व या प्रकरणी सरकारने माफी मागावी, अशी मागणी लावून धरली.

Web Title: Marathi news Radha Krishna vikhe patil statement marathi school