रेल्वे, राज आणि बरेच काही..!

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 21 मार्च 2018

लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान अशा नेत्यांनी रेल्वे आपल्या प्रदेशातील तरूणांना रोजगार देण्यासाठी वापरली हे एकेकाळचे राज यांचे आवडते वास्तव होते. भूमीपुत्र या रोजगाराला पारखे राहिले असे वास्तव ते बोलून दाखवत. 

भारत हा तरूणांचा देश आहे. येथील 'डेमोग्राफीक डिव्हिडंड'बद्दल जगाला उत्सुकता आहे. युवकांच्या संख्येबद्दल कौतुकाने बोलले तर जाते. पण त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला, त्या सोडवायला कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाही अशी स्थिती आहे. इंदिरा गांधी यांची हत्या न पाहिलेला वर्ग आज मतदार आहे. या मतदारानेच गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली. मोदींना या वर्गाची गरज पूर्णत: ज्ञात असल्याने त्यांनी या तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या रोजगारक्षम कार्यक्रमांवर भर देण्याची घोषणा केली होती. उपजीवीकेचे साधन मिळवून देणाऱ्या प्रशिक्षणावर कौशल्य विकासावर त्यांनी भर दिला होता. हा कार्यक्रम अन्य घोषणांप्रमाणे यशस्वीपणे राबवला न गेल्याने देशातील युवक हताश झाले आहेत. 

आगामी निवडणुकात या निराशांची फौज मोदींची जादू संपवू शकते. धर्मवाद, घोषणाबाजी अशा अनेक बाबींवर मोदी सरकारला धारेवर धरले जाते. पण या सरकारचे खरे अपयश रोजगारनिर्मितीत न मिळालेल्या यशाचे आहे. सतत भाषणबाजी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या बडया नेत्याला हे लक्षात आलेले दिसते आहे. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे नावाच्या तरूण नेत्याने जी वक्‍तव्ये केली त्यात तरूणांचा हा खरा प्रश्‍न कुठेही प्रतिबिंबित झाला नव्हता. राज ठाकरे वयाने तरूण आहेत, ते मोदीमुक्‍तीच्या घोषणा देत बोलत असताना, एकेकाळी त्यांना डोक्‍यावर घेऊन नाचणाऱ्या माध्यमांवर अकारण टीका करताना देशातील खरी समस्या कशी समजू शकले नाहीत असे राहून राहून वाटत होते. 

मुंबईतील रेल्वे बंद पाडणाऱ्या अॅप्रेन्टीस युवकांना आधाराचा खांदा देत राज यांनी ही भाषणातील ही चूक दुरुस्त केलेली दिसते. रेल्वे, रेल्वेतील भरती हे राज यांच्या आवडीचे विषय आहेत. मुंबईत दररोज किती रेल्वेगाडया येतात याचे हिशेब तपासताना भारतात सर्वाधिक मोठा रोजगार देणारी भारतीय रेल्वे ही केवळ काही प्रांतातील तरूणांना संधी देत असल्याची माहिती राज यांना गवसली होती. लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान अशा नेत्यांनी रेल्वे आपल्या प्रदेशातील तरूणांना रोजगार देण्यासाठी वापरली हे एकेकाळचे राज यांचे आवडते वास्तव होते. भूमीपुत्र या रोजगाराला पारखे राहिले असे वास्तव ते बोलून दाखवत. 

कल्याणला रेल्वेभरतीसाठी आलेल्या परप्रांतीयांवर हात साफ करून घेण्याचा प्रकार मनसेने केला होताच. त्याची मोठी आवृत्ती कमबॅक करण्यासाठी राज यांनी आता वापरलेली दिसते. ऐन परीक्षांच्या काळात मुंबई थांबवणे हे मतपेटीत वाढ करणारे ठरेल का माहीत नाही. पण तरूणांच्या समस्या हाती घेऊन अराजक निर्माण करण्याचा मार्ग राज यांनी पुन्हा एकदा अंगीकारलेला दिसतो. आधी मोदींची स्तुती नंतर मोदींपासून मुक्‍ती ,निवडणूक लढण्याची घोषणा मग नंतर घूमजाव अशा कोलांटयाउडया मारणारे राज ठाकरे विश्‍वासार्हता गमावून बसले आहेत. ती मिळवायला त्यांना प्रचंड मेहनत करावी लागेल. आमदारसंख्या भूतकाळ आहे, संघटना मागील काळात नव्हती, वर्तमानात दिसत नाही आणि भविष्यात उभी रहाण्याची स्थिती नाही. अशा परिस्थितीत आंदोलने हा मार्ग चोखाळणे तसे सोपे असते. खळळखटयाक झाले की दंगा केल्याचे समाधान मिळते. विधायक कामाची दिल्ली दूर असल्याने बेदिली माजवणे सोपे जाते. 

वाहतूक ही मुंबईची मोठी समस्या आहे. ओला, उबेर या खाजगी गाड्‌यांच्या बंदला समर्थन देत मनसेने काहीतरी केले आहे अन् दुसऱ्याच दिवशी यातायात बंद करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राज खोऱ्याने मते खेचतील, असे नाही. पण सरकारसंबंधात झालेल्या भ्रमनिरासाला नेतृत्व देऊ बघतील. अमराठी मंडळींविरोधातील मनसेच्या आंदोलानामुळे महाराष्ट्रातील छोटे-मोठे उद्योग एकेकाळी ठप्प पडले होते. सेनेने प्रारंभीच्या काळात अंगीकारलेली भूमीपुत्रांच्या रोजगारी समस्या हाती घेण्याची पद्धत मनसेने पुन्हा एकदा अंगीकारली आहे. यात कुणाचेही भले नाही. हे तर खरेच पण सरकारला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना या तरूणांच्या असंतोषाला संघटित रुप येण्यापासून थांबवावे लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत, तरूण आहेत. बेरोजगारांच्या फौजांचे काय करायचे हा प्रश्‍न त्यांना भेडसावतो काय? त्यांचे गुरू नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यावरचे उत्तर आहे काय ? 
राज यांना समस्येला उत्तर शोधायचे नाहीये, ते काम फडणवीसांचे आहे, मोदींचे आहे आणि भारत जिंकू बघणाऱ्या अमितभाई शहांचेही आहे.

राज ठाकरे यांच्यात सातत्यपूर्णतेचा लवलेश नाही. पण अशी आंदोलने हवा तयार करतात. ती सुरू करणाऱ्यांचे या खेळात काही जात नसते. राज्यकर्त्यांना मात्र त्यातून मार्ग काढून समाजाला शांत करावे लागते. राज यांना वणवा पेटवायचा आहे, तेवढे झाले तरी त्यांना बाकी काही करण्याची गरज भासणार नाही. खरे तर राज यांनी विधायक कामांकडे जास्त लक्ष द्यावे. महाराष्ट्राच्या विकासासाठी तयार केलेल्या ब्लूप्रिंटपेक्षा रेल्वे अडवणे सोपे आहे, वांझोटेही. राज यांचा भर आक्रमक मनसुब्यांवर दिसतो. त्याकडे सरकारला लक्षपूर्वक पहावे लागेल. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. ते थांबून जाणे परवडणारे नाही. राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्याबद्दलच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. मोदीमुक्‍त भारताचा संदेश दिल्याने मोदीविरोधकांना ते भाषण कमालीचे आवडले होते. मोदीभक्‍तांनी एका आमदाराच्या जोरावर दिलेली मुक्‍तीची हाक साहजिकच कडव्या टीकेचा विषय ठरवली. जनमनात स्वत:बद्दल प्रचंड उत्सुकता तेवती ठेवणारा हा नेता अधूनमधून बोलतो. आझाद मैदानावरचे पोलिसांच्या समर्थनार्थ केलेले भाषण असेल किंवा परळच्या रेल्वे दुर्घटनेनंतर चर्चगेट स्थानकाबाहेर घेतलेली छोटेखानी सभा असेल राज लक्ष वेधतात.

जनता भलेही त्यांना मते देत नसेल. पण त्यांचे भाषण मात्र ऐकते. त्यामुळेच ते दुर्लक्षून चालणार नाही. परवाच्या नववर्षसभेतील भाषणात बरेच विरोधाभास होते. काही वर्षांपूर्वी राज अचानक गुजरातेत थडकले होते अन् तेथील प्रगतीचा स्तिमीत करणारा आलेख त्यांनी स्वत:हून जनतेसमोर मांडला होता. (मोदींच्या निमंत्रणावरुन ते तेथे गेल्याचे ऐकिवात तरी नाही) मोदींवर आरत्या ओवाळणारा हा पहिलाच अन्यपक्षीय नेता असावा. आता भूमिका बदलल्या आहेत. माणूस प्रगल्भ होत असतो असे म्हणतात. त्यामुळेच की काय पण आता त्यांना मोदींपासून भारताने स्वत:ची सुटका करून घेणे गरजेचे वाटते. पुन्हा पुढच्या सहा वर्षांनी नेमके काय वाटेल ते माहीत नाही, पण असा प्रश्‍न ठाकरे घराण्यातील कुणालाही विचारायची तौहीन करायची नसते. (मोदी शहा मराठी वाचत नसल्याने त्यांच्याबददल टीकात्मक लिहिणे सोपे असते ,सांप्रतकाळी फॅशनेबलही) नितीन गडकरी हे रोडकरी या गौरवास पात्र असल्याचेही ते काही काळापूर्वी म्हणाले होते. 

राज यांच्या कित्येक भाषणातला प्रत्येक शब्द माध्यमे घराघरात पोहोचवतात. पण ही प्रसिध्दीमाध्यमे मोदींची आणि विशेषत्वाने अमित शहांची बटिक असल्याची माहिती त्यांनी जनतेला दिली आहे. माझ्या भाषणाच्यावेळी वीजपुरवठा बंद केला गेला नाही, तरच ते तुम्हाला ऐकायला मिळेल असे ते म्हणाले. अशी वीज कुठे गेल्याची बातमी नाही, ती शहा यांच्या दमनकारी नीतीने दडवली गेली का माहीत नाही पण शहा यांनी माध्यमांच्या मालकांना दूरध्वनी करुन ते भाषण नक्‍कीच बंद पाडले नाही. कारण भाषण दिसत होते. (शहा यांना राज दखल घेण्यायोग्य वाटत नाहीत की काय ? गुजराती दुकानदारांनी काही संपर्क असेल तर सांगावे, असो) हे भाषण करताना राज यांनी केलेली काही वक्‍तव्ये त्यांच्याबद्दल ममत्व असणाऱ्यांना नाराज करणारी होती. मोदी उदयापूर्वीच्या काळात संघविचारांबद्दल आस्था असणारा मतदार राज यांच्याकडे आशेने बघत होता. त्यावेळी भाजपकडे नायक नसल्याने या मतांचा लंबक राज यांच्यावर काहीकाळ स्थिरावला होता. कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीत काही वर्षांपूर्वी मनसेला मिळालेली मते या मंडळींची होती. आज परिवारावर निष्ठा असलेली मंडळी मोदींवर काहीशी नाराज आहेत. घोषणा प्रत्यक्षात येत नाहीत ही त्यांची खंत आहे. ही नाराज मंडळी राज यांना पसंती देतील का हा प्रश्‍न असला तरी भविष्यात तसे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सरसंघचालक मोहन भागवत यांना भाषणात ओढून या वर्गाला राज यांनी अकारण नाराज केले. सरसंघचालकांचा जाहीर उल्लेखही या मंडळींना आवडत नाही, राज तर टीका करून मोकळे झाले. संरक्षणक्षेत्रात लुडबूड करणाऱ्या उदयोगाबद्दल राज बोलले तरीही भाषण कोणत्या वर्गासाठी होते हे कळत नव्हते. ऍप्रेन्टीसांना पाठिंबा देऊन राज यांनी नाराज युवकांना चुचकारल्यासारखे दिसते तरी आहे. हे आंदोलन किती काळ टिकेल माहीत नाही. शिवाय त्यामुळे काही प्रश्‍नही निर्माण होणार आहेत. संघराज्य प्रणालीत स्थानिकांना नोकरीत वाटा असावा का येथपासून चेल्याचपाटयांना नोकरी देणार्रंया लेकुरवाळ्या रेल्वेवर अजून किती भार टाकणे शक्‍य आहे. येथपर्यंतचे अनेक प्रश्‍न समोर येतात. राज यांना खरेच त्याबद्दल काही विचार मांडायचे आहेत काय? मुंबई बदलली आहे, जगही बदलले आहे. या चकचकीत आधुनिक जगाने युवकांना रोजगार दिले नाहीत हे खरेच आहे. पण त्यावर उत्तर खळळखटयाक करणे आहे की ब्लूप्रिंट ? राज यांनीच उत्तर शोधलेले बरे. जनतेला कृती हवी असते.

शेतकरी मोर्च्यात मला सत्ता द्या, असे विधान करणारे राज ठाकरे कोणाच्या ताकदीवर अशी स्वप्ने पाहतात ते माहीत नाही. उत्तर शोधण्याची त्यांची मानसिकता असेल तर ते त्यांच्या आगामी वाटचालीसाठी बरे ठरेल. किसान सभेच्या लाँग मार्चच्या आयत्या मंचावर गेलेल्या कॉंग्रेसने आजही चोखपणे पत्रक काढले आहे. देशात दररोज 33 हजार युवक नोकरी मिळवण्याच्या स्पर्धेत शिरतात अन् रोजगार तयार होतात. केवळ 450. शिवाय 551 नोकऱ्या दररोज रद्दबातल होतात, असे भयावह वास्तव प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समोर आणले आहे. राजवट कुणाचीही असो, हे भयावह आहे. अपेक्षांचे ओझे उंचावणारे मोदी यावर उत्तर शोधू शकले असते. तर फार बरे झाले असते. 

Web Title: Marathi News Railway Raj and All Artcle written by Mrunalini Naniwadekar