मावळात कृषी पर्यटनाला ‘सुगीचे दिवस’ 

मावळात कृषी पर्यटनाला ‘सुगीचे दिवस’ 

टाकवे बुद्रुक - आंद्रा, जाधववाडी, ठोकळवाडी धरणाचा अथांग जलाशय... निसर्ग संपन्नतेने नटलेली वनराई... धरणाच्या वेढ्यावर नागमोडी वळणचा डांबरीकरणाचा पक्का रस्ता... शहरापासून हाकेच्या अंतरावरील निसर्गाची साथ... कृषीपर्यटनाला आणि जलपर्यटनाला साद घालीत आहे. अनेक हटके कॅम्स, फॉर्म हाउसेस, कृषी पर्यटक केंद्र स्वागताला सजली आहे. तरीही या परिसरात अस्सल मावळी थाटातील आमटी-भाकरी, बेसन-भात, मासवडी, चुलीवरील मटण-भाकरी, नाचणी, सावा, वरईची भाकरी सारख्या पारंपरिक चवदार आहाराची चव चाखायला येणाऱ्या पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवायला अधिकचा वाव आहे. 

कोणीतरी पहिले पाऊल उचलून त्याची सुरवात केली पाहिजे.  वेगवेगळ्या धनिकांनी मोठमोठे कॅम्स उभारून त्यात साउथ इंडियन, पंजाबी, गुजराती जेवणाचा बेत असणाऱ्या हुरडा पार्टी रंगवायला सुरवात केली खरी, पण अस्सल मावळी थाटातील नाचणीची भाकरी, लाल चटणी, कांदा, पिठलं, उडिदाचे गुट आणि इंद्रायणीचा भात या रूजकर भोजनाची ओढ कायम आहे. निळशीतील वायएमसीएचा कॅम्स असो किंवा कांब्रे, डाहुली, वाहनगाव, तळपेवाडी, फळणेतील पर्यटक पॉईट येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. व्हेज-नॉनव्हेजचा तडका येथे मिळतो. वनडे पिकनिकसाठी या परिसरात बाराही महिने गर्दी वाढू लागली आहे. चिंब पावसात वर्षाविहारासाठी, हिवाळ्यात गुलाबी थंडी अनुभवायला आणि उन्हाळ्यात शीतलता जाणवायला पर्यटक येऊ लागले आहेत. येथे येणाऱ्या शहरवासीयांना रोज रोज तेच ते मसालेदार, चमचमीत जेवण बाजूला ठेवायचे आहे. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ हवामान, सूर्यप्रकाश, प्रदूषण विरहित ऑक्‍सिजन घ्यायचा आहे. बिसलरीचे पाणी न पिता धरणातील, विहिरीतील मधुर पाण्याची चव चाखायला शहरवासीय या ठिकाणी आतुरतेने येत आहे. त्यांना या दिवसात ग्रामीण जीवन अनुभवायचे आहे. त्यामुळे या परिसरात कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस येऊ घातले आहे. 

भोयरे, कशाळ, फळणे येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. बेंदेवाडी, निगडेत समूह शेतीची पाठराखण केली जात आहे. या गावात कृषीपर्यटनाला अधिक वाव मिळत आहे. निळशी, वाहनगाव, माळेगाव, शिरे, शेटेवाडी, फळणे, कोंडिवडे, पवळेवाडी, जाधववाडीत कृषीपर्यटनासोबत जलपर्यटनाला संधी आहे. कृषी पर्यटन व जलपर्यटनाला स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.  आंदरमावळात कृषी पर्यटन व जलपर्यटनाच्या या संधी उपलब्ध होत आहेत. सर्वाधिक पर्यटकांची वर्दळ पावसाळ्यात असते. त्यापाठोपाठ हिवाळा आणि उन्हाळ्यातही गर्दी वाढत चालली आहे. नववर्षाच्या स्वागताला निळशी, कांब्रे, वाहनगाव, वडेश्‍वर, तळपेवाडीत चांगली गर्दी झाली होती. 

डाहूली, बेंदेवाडी, लालवाडीत पावसाळ्यात घरगुती जेवणाला मोठी मागणी आहे. वाहनगाव येथे हुरडा पार्टी महिन्यात दोनदा चारदा होते.

पावसाळ्यात २५ हजार पर्यटकांची गर्दी होते. सर्वाधिक पर्यटक निळशीच्या वायएमसीएत येत आहेत. त्यापाठोपाठ कांब्रे, वाहनगाव, तळपेवाडीत येत आहे. दिवसेंदिवस वाढत्या पर्यटकांनी गर्दीने या व्यवसायाला अधिक वाव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com