"नाणार'ला होणाऱ्या विरोधाची दखल घेणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - कोकणातील नाणार प्रकल्पास स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेतला जाणार असल्याचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत केले. 

कोकणातील नाणार येथे तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण धोक्‍यात येत असल्याने 17 गावांपैकी 14 गावांच्या ग्रामपंचायतींनी जमीन भूसंपादनाच्या प्रक्रियेत विरोध दर्शविला असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करणे अवघड आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. 

हा विषय एक मार्चला तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करण्यात आला होता; मात्र त्या दिवशी सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे यावर सविस्तर निवेदन करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार उद्योगमंत्री देसाई यांनी आज निवेदन केले. 

या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला आहे; तसेच त्याबाबतची पत्रेही देण्यात आली. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प लादणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार याबाबत पुढील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचा खुलासा त्यांनी निवेदनाद्वारे केला. 

त्याचबरोबर नाणार प्रकल्पाबाबत "मॅग्नेटिक महाराष्ट्र' या गुंतवणूक समेटमध्ये कोणताही सामंजस्य करार करण्यात आला नसल्याची बाबही त्यांनी या वेळी स्पष्ट केली. 

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे नितेश राणे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निवेदनावर हरकत घेतली; तसेच "कोकणचा कसाई सुभाष देसाई' अशा घोषणाही दिल्या. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांची हरकत फेटाळून लावली. अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी नाणार प्रकल्पावर अर्धा तास चर्चा घेण्याची मागणी केली. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार देत याबाबत चर्चा ठेवण्याचे आश्वासन दिले. 

Web Title: marathi news subhash desai maharashtra