वर्णद्वेषाच्या व्यथेचे सात सेकंद 

श्रीमंत माने
मंगळवार, 20 मार्च 2018

वर्णद्वेषातून होणाऱ्या हत्यांवर आधारित "सेव्हन सेकंड्‌स' हे गुन्ह्याचं नाट्यरूपांतर मथळ्यापल्याडच्या माणुसकीचं महत्त्व सांगतं. केवळ अमेरिकन समाजानेच नव्हे, तर जगात असं जिथं जिथं घडत असेल तिथं बदल घडविण्यासाठी प्रत्येकानं पुढं यायला हवं, हा संदेश या मालिकेतून दिला गेलाय..... 

वर्णद्वेषातून होणाऱ्या हत्यांवर आधारित "सेव्हन सेकंड्‌स' हे गुन्ह्याचं नाट्यरूपांतर मथळ्यापल्याडच्या माणुसकीचं महत्त्व सांगतं. केवळ अमेरिकन समाजानेच नव्हे, तर जगात असं जिथं जिथं घडत असेल तिथं बदल घडविण्यासाठी प्रत्येकानं पुढं यायला हवं, हा संदेश या मालिकेतून दिला गेलाय..... 

बर्फानं आच्छादलेला आसमंत. शुभ्र थरांना छेद देत जाणारा रस्ता. नुकताच झालेला अपघात. रस्त्याकडेला पडलेल्या सायकलची अजूनही गरगरत असलेली चाकं. बर्फाच्या थरात झिरपत जाणारं रक्‍त अन्‌ त्या दृश्‍याच्या पृष्ठभूमीला "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी.' एरवी एखाद्या "क्राइम सीन'मध्ये दिसणारा रस्त्यावरचा रक्‍तामांसाचा चिखल, छिन्नविछिन्न मृतदेह वगैरे बटबटीतपणा टाळून चित्रित केलेलं हे दृश्‍य     

"नेटफ्लिक्‍स'च्या "सेव्हन सेकंड्‌स' मालिकेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल. ती दुर्घटना असते, सायकलवरून घराकडं निघालेला पंधरा वर्षांचा कोवळा मुलगा ड्यूटीवर नसलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या कारने दिलेल्या धडकेत मृत्युमुखी पडल्याची. वरवर विचार केला तर हे अनेकांपैकी एका गुन्ह्याचं नाट्यरूपांतर, क्राइम ड्रामा. आपल्याकडच्या "सावधान इंडिया'सारखा. पण निर्मात्या-लेखिका वीणा सूद, तसेच गेव्हिन ओकोनॉर यांच्या दिग्दर्शनानं "सेव्हन सेकंड्‌स' नावाचे नाट्यरूपांतर "ह्यूमन स्टोरिज बिहाइंड हेडलाइन' बनवलं आहे. अमेरिकेतल्या वर्णद्वेषाची काळी किनार त्या प्रसंगाला दिलीय.

गेल्या 23 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या दहा भागांच्या मालिकेनं पाश्‍चात्त्य जगात, खासकरून अमेरिकेत वर्णद्वेषामुळं कृष्णवर्णीयांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीच्या जखमांवरची खपली निघालीय. काळ्या माणसांच्या वेदनांवर बोललं, लिहिलं जातंय. एकाच देशातल्या गोऱ्या व काळ्या अशा दोन नागरिकांना राजकीय, प्रशासकीय, सामाजिक व्यवस्थेकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या वागणुकीची चर्चा सुरू आहे. तिथली वर्तमानपत्रं मालिकेवर लिहिताहेत, सोशल मीडिया व्यक्त होतोय. कथा व सादरीकरण या दोन्ही अंगांनी केलेल्या परीक्षणातून वरचे स्टार दिले जाताहेत. 
   ब्रेन्टॉन बटलर हा मुलगा कृष्णवर्णीय कुटुंबातला. लॅट्रिस ही त्याची आई, तर इशाह हे वडील. दोघेही धार्मिक वृत्तीचे. रेगिना किंग हिनं मालिकेत आईची, तर रसेल हॉर्नसबाय याने वडिलांची भूमिका वठवलीय. विशेषतः पुत्रवियोगानं व्याकूळ रेगिनाच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. ब्रेन्टॉनच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत पीट जाब्लोन्सकी नावाच्या पोलिसाची भूमिका बीन नॅपनं साकारलीय. पण अपघाताच्या पलीकडं मालिकेत खरी कथावस्तू आहे,

गोऱ्या जाब्लोन्स्कीला वाचविण्यासाठी तमाम गोऱ्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या प्रयत्नांची व डावपेचांची. "हिट ऍन्ड रन'ची ती केस दडपण्यासाठी केवळ रंगाच्या आधारे संगनमताने एकत्र आलेले संबंधित अन्‌ मुलगा गमावलेल्या मातापित्यांचा संघर्ष लक्षवेधी आहे. 
"सेव्हन सेकंड्‌स' मालिकेच्या निर्मात्या, लेखिका-वीणा सूद भारतीय वंशाच्या. त्यांचे वडील मोहेंद्र सूद कॅनडात स्थायिक झालेले भारतीय डॉक्‍टर, तर आई फिलिपिनो. जन्म टोरोन्टोचा. बालपण व शिक्षण अमेरिकेत ओहिओ, सिनसिनाटी इथल्या कंट्री डे स्कूल, बर्नार्ड कॉलेजमध्ये झालं.

पॅसिफिक रेडिओसाठी पत्रकार म्हणून काम केल्यानंतर न्यू यॉर्क विद्यापीठाच्या फिल्म्स स्कूलमधून "मास्टर इन फाइन आर्टस्‌' ही पदवी घेतली. "एमटीव्ही'वरची "द रिअल वर्ल्ड', "सीबीएस'वरील "कोल्ड रेस' या वीणाने दिग्दर्शित केलेल्या मालिका प्रामुख्याने गुन्हेगारीवर बेतलेल्या. "द किलिंग' ही ऍमी पुरस्कारांसाठी नामांकन झालेली निर्मिती, तर "सेव्हन सेकंड्‌स'ची पहिली आवृत्ती वाटावी अशी. 
      तीनेक वर्षांपूर्वी, 2015 मध्ये कृष्णवर्णीय माणसं, मुलं पोलिसांकडून खोट्या चकमकीत, पाठीवर गोळ्या झाडून किंवा अपघाताचा बनाव करून मारली जात असल्याचे टीव्हीवरचे वृत्तांत पाहून वीणा सूद यांना ही नवी मालिका सुचली. विशेषत: कोवळी मुलं गमावलेल्या मातापित्यांच्या असह्य वेदनांची अनुभूती त्यांनी घेतली. मालिकेची संकल्पना पुढे जात राहिली. प्रत्यक्षात अशा प्रसंगांचा सामना केलेल्या अनेक पालकांना, ती प्रकरणे हाताळलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना, वकील, कोर्टात याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या लॉस एंजेलिसमधल्या "कलर ऑफ चेंज'सारख्या स्वयंसेवी संस्थांशी वीणा व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यांच्या अनुभवांच्या आधारे लिखाण केलं गेलं. कथानक कल्पनेऐवजी वास्तवाच्या जवळ गेलं. नाट्यही जिवंत बनलं. 
"सेव्हन सेकंड्‌स'नं अमेरिकेला व जगालाही दिलेला

संदेश अधिक महत्त्वाचा आहे व वीणा सूद यांनी तो स्पष्टपणे बोलूनही दाखवलाय. केवळ रंगाच्या किंवा धर्माच्या, जातीच्या आधारावर माणसाच्या जिवाची किंमत ठरवण्याचा अन्‌ किड्यामुंग्यांसारखे माणसांचे जीव घेण्याचा प्रकार भलेही वर्चस्ववादी समूहाला आवडणारा, सोयीचा असेल, पण त्यानं माणुसकी संपते. महत्त्वाचं म्हणजे, असं काही आपल्या अवतीभोवती घडत असेल, तर ते थांबविण्यासाठी, अमेरिकनांच्या भाषेत "चेंज', बदलासाठी प्रत्येकानं पुढं यायला हवं. अन्य कुणीतरी पुढं येईल व व्यवस्थेत बदल घडवील, असं म्हणून काठावर बसून वाट पाहणं योग्य नाही. "सेव्हन सेकंड्‌स'मध्ये दाखविलेल्या एखाद्या समूहाच्या वाट्याला आलेल्या दुय्यम वागणुकीच्या वेदना केवळ अमेरिकेतच आहेत, असं नाही. वेगवेगळ्या रूपामध्ये त्या जगाच्या कानाकोपऱ्यांत आहेत. अमेरिकेचं, तिथल्या खुल्या समाजाचं वैशिष्ट्य हे, की तिथं त्याविरोधात मोकळेपणानं व्यक्‍त होता येतं. मालिका दाखवली जाऊ शकते. अन्यत्र तेवढंही शक्‍य आहे का, हा प्रश्‍न आहे. 
 

Web Title: MARATHI NEWS TARANG ANTRANG SHRIMANT MANE

फोटो गॅलरी