...असा झाला कोपर्डी प्रकरणाचा उलगडा

kopardi
kopardi

कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याबद्दल तिघा जणांना आज (बुधवार) फाशीची शिक्षा झाली. काय होते हे प्रकरण आणि कसा झाला या घटनेचा उलगडा...?

आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्या कुकृत्याने कोपर्डी गाव हादरले होते. ही घटना १३ जुलै रोजी घडली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५, रा. कोपर्डी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. सुरक्षेअभावी त्याला श्रीगोंदे पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. जितेंद्रबरोबर अन्य कोणी होते का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. ‘निर्भया’च्या मैत्रिणी आणि काही नातेवाइकांशी बोलल्यावर जितेंद्र हा संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेसह दुचाकीवर फिरत असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी १५ जुलैला रात्री साडेअकरा वाजता संतोष भवाळ याला खांडवी (ता. कर्जत) येथून ताब्यात घेतले. १६ जुलै रोजी सकाळी नितीन भैलुमेला पुणे येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना नगर येथील न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी छुप्या मार्गाने आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा केला. 

पोलिसांनी ‘निर्भया’ची उत्तरीय तपासणी करून रक्त व दातांचे ठसे वैद्यकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले. या प्रकरणात आणखी एक (चौथा) आरोपी असल्याचा पोलिसांना संशय होता; मात्र त्याबाबत ठोस पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. दरम्यान, जिल्हाभर मोर्चे- आंदोलने सुरू होती. त्याचे लोण राज्यभर पसरले. तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांनी ७ ऑक्‍टोबर २०१७ रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याचे कामकाज सुरू झाले. आरोपी जितेंद्र शिंदे याला घटनास्थळी अनेकांनी पाहिले होते; पण अन्य दोन आरोपींना तेथे कोणी पाहिले नव्हते. मात्र, घटनेच्या दोन दिवस आधी तीन आरोपी एका दुचाकीवर फिरत असल्याचे स्पष्ट झाले. 

‘निर्भया’ आणि तिच्या मैत्रिणी शाळेतून तुकाई लवणवस्ती रस्त्याने घराकडे जात असताना पप्पू शिंदे याने ‘निर्भया’ला हाताला धरून बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. ‘तुला पाहून घेतो’ असे म्हणून, ‘थांब तुला काम दाखवितो’ असा दम दिला. त्या वेळी अन्य दोन आरोपी हसले. त्या वेळी मैत्रिणी ‘निर्भया’सोबत होत्या. ‘निर्भया’ घाबरून घरी गेली. तिला काही समजत नव्हते. त्यामुळे दोन दिवस शाळेत गेली नाही. या घटनेवरून वरील दोन्ही आरोपींचा कट रचण्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच महत्त्वाच्या आणि परिस्थितिजन्य पुराव्यावरून आरोपींवर, कट करून खून व बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात यावा, अशी मागणी ॲड. उज्ज्वल निकम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने परिस्थितिजन्य पुरावे लक्षात घेऊन आरोपींवर ‘कट रचून खून केल्या’चा आरोप ठेवला.

आरोपी जितेंद्र शिंदे याला ‘निर्भया’च्या चुलत भावाने घटनास्थळी पाहिले होते, तर अन्य दोन आरोपी नितीन भैलुमे, संतोष भवाळ दोन- चार दिवसांपासून आरोपीबरोबर दुचाकीवर फिरत होते. त्यांनी ‘निर्भया’ची छेड काढल्याचे मैत्रिणींनी न्यायालयात सांगितले. तसेच, अन्य दोन साक्षीदारांनी मुख्य आरोपीसोबत फिरताना पाहिले होते, अशी साक्ष न्यायालयात दिली.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या रक्ताचे नमुने आणि ‘निर्भया’च्या अंगावरील दातांचे ठसे जुळले होते, असे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवाल मानवी मन सुन्न करणारा होता. आरोपीने ‘निर्भया’च्या छातीवर चावा घेतला होता. तिचे डोक्‍याचे केस उपटले होते. गुप्तांगावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या. तोंडावर ओरखडे होते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायायलाही सांगितले. आरोपींविरुद्ध ३१ साक्षीदार तपासण्यात आले. आज न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरविले. लवकरच त्यांना शिक्षाही होईल; पण चिमुकलीचा गेलेला जीव परत येणार नाही.

खटल्याचे कामकाज लांबले
आरोपींच्या वकिलांमुळे खटल्याचे कामकाज लांबले, असा आरोप ॲड. उज्ज्वल निकम यांनी केला. अॅड. बाळासाहेब खोपडे वारंवार न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दंडही केला. त्याचबरोबर अॅड. प्रकाश आहेर हेही अनेक वेळा सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे सुमारे नऊ वेळा खटल्याचे कामकाज लांबले, असा आरोप निकम यांनी शेवटच्या सुनावणीच्या दिवशी केला.

आरोपींवर तीन वेळा हल्ला
शालेय मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला, ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती. त्यामुळेच आरोपी नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात दोनदा हल्ला झाला, तर न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आवारात ‘शिवबा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीकडे अश्‍लील सीडी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या घराची झडती घेतली तेव्हा तेथे अश्‍लील सीडी आढळून आल्या, तर त्याच्या मोबाईलमध्येही अश्‍लील चित्रफीत आढळून आली. तो कायम अश्‍लील चित्रफिती पाहत असे, असे त्याच्या जवळच्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.

आरोपींची पार्श्‍वभूमी

  • जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय २५, रा. कोपर्डी, ता. कर्जत) याचे आई- वडील मजुरी करतात. तोही मजुरी करून पोट भरीत होता. तो गावातीलच वीटभट्टीवर काम करीत होता. घटनेच्या अगोदर चार दिवस वीटभट्टीचालकांकडून त्याने उचल घेऊन नवीन दुचाकी खरेदी केली होती.
  • संतोष गोरख भवाळ (वय ३०, मूळ गाव खांडवी, हल्ली रा. कोपर्डी) याचे आई- वडीलही मजुरी करतात. तोही वीटभट्टीवर मजुरी करीत होता.
  • नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६, रा. पुणे, हल्ली रा. कोपर्डी) याचे बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झाले आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा त्याचा मावस भाऊ असल्याने त्याचे कुटुंब नुकतेच काही दिवसांपूर्वी कोपर्डी येथे राहण्यास आले होते. त्याचे आई-वडीलही मजुरी करतात.

न्यायालयाची भूमिका
आरोपी पक्षातर्फे बाजू मांडताना अॅड. प्रकाश आहेर, अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी, ‘‘कोपर्डी खटल्यामुळे मराठा मोर्चे निघाले, नेते बाहेर लगेच घोषणा करतात की आरोपीला फाशी होईल, आरोपी एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे त्याला गुन्ह्यात गोवण्यात आले आहे,’’ असे वारंवार सांगितले. यावर न्यायाधीशांनी त्यांना, ‘न्यायालयात आणि खटल्याच्या कामकाजासंदर्भात बोला. बाहेर कोण काय करते याला काहीच महत्त्व नाही,’ असे सुनावले. 

कोपर्डीला छावणीचे स्वरूप
कोपर्डी घटनेनंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे सर्वत्र मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिस रोज नागरिकांची समजूत काढीत होते. तुकाई लवणवस्ती आणि कोपर्डी गावाला जणू पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. ‘निर्भया’च्या घराभोवतीही पोलिसांचा पहारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com