महिला आरोग्यासाठी "अस्मिता' 

महिला आरोग्यासाठी "अस्मिता' 

मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागातील महिला व 11-19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासह त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

मासिक पाळीच्या काळात योग्य ती काळजी न घेतल्याने महिला आणि मुलींमध्ये प्रजननाशी निगडित अनेक समस्या निर्माण झाल्याचे ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. तसेच 11-19 वयोगटातील किशोरवयीन मुली सर्वसाधारणपणे वर्षातील 50 ते 60 दिवस मासिक पाळीच्या काळात शाळांमध्ये अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याच्या काळजीबाबत जनजागृतीची गरज ओळखून ही योजना राबविण्यात येत आहे. 

योजनेंतर्गत उमेदपुरस्कृत स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या समूहांच्या माध्यमातून आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित माहिती, शिक्षण आणि जनसंवाद विषयक साहित्य तयार करणे व विविध बैठकांमार्फत महिला-मुलींमध्ये याबाबत प्रसार करण्यात येणार आहे. 

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीकरिता नोडल एजन्सी म्हणून उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान) तर कुटुंबकल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 

ग्रामीण भागातील महिलांना व 11-19 या वयोगटातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींना वगळून इतर किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याबाबतच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेबाबत संबधित विभागाच्या समन्वयाने अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे. 

नोंदणीसाठी "ऍप'चाही पर्याय 
अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण भागात महिलांना "अस्मिता' या ब्रॅंड नावाने 240 मिलीमीटर आठ सॅनेटरी नॅपकिन 24 रुपये प्रती पॅकेट व 280 मिलीमीटर आठ सॅनेटरी नॅपकिन 29 रुपये प्रती पॅकेट याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11-19 या वयोगटातील मुलींना पाच रुपये प्रतिपॅकेट या सवलतीच्या दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदविण्यासाठी व पुरवठा करण्यासाठी विशिष्ट "ऍप' तयार करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com