नाशिकमध्ये 25 पासून जागतिक कृषी महोत्सव-आबासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिक ः शेतमाल अन्‌ प्रक्रिया उत्पादनांच्या "मार्केटींग'साठी "सात्विक कृषीधन' हा ब्रॅंड विकसित करण्यात आला आहे. त्यातंर्गतची उत्पादने विक्रीसाठी मुंबईमधील एक हजार "शॉपी' जोडण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे, तर शुद्ध अन्‌ ताजा भाजीपाला विकत घेण्यासाठी अगोदर पैसे द्या असाही उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती समर्थ सेवा मार्गाचे आबासाहेब मोरे यांनी आज येथे दिली.

नाशिक ः शेतमाल अन्‌ प्रक्रिया उत्पादनांच्या "मार्केटींग'साठी "सात्विक कृषीधन' हा ब्रॅंड विकसित करण्यात आला आहे. त्यातंर्गतची उत्पादने विक्रीसाठी मुंबईमधील एक हजार "शॉपी' जोडण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे, तर शुद्ध अन्‌ ताजा भाजीपाला विकत घेण्यासाठी अगोदर पैसे द्या असाही उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती समर्थ सेवा मार्गाचे आबासाहेब मोरे यांनी आज येथे दिली.

 
त्र्यंबकेश्‍वरचे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर 25 ते 29 एप्रिलला जागतिक कृषी महोत्सव होत आहे. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदर्शनस्थळी भूमीपूजनाचा सोहळा झाला. यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत आबासाहेब मोरे म्हणाले, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. कृषी दिंडी, वधू-वर परिचय मेळावा, युवा महोत्सव, सरपंच-ग्रामसेवक मांदियाळी आणि विविध विषयांवर चर्चासत्र होतील. 

 बियाण्यांमध्ये स्वावलंबन व्हावे म्हणून देशी बियाण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशी बियाण्यांवर काम करणाऱ्या पंधरा संस्थांना महोत्सवात मोफत 15 स्टॉल देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय 375 कंपन्यांचे स्टॉल महोत्सवात असतील. याशिवाय गरीब शेतकरी कुटुंबातील वधू-वरांचा परिचय मेळावा होईल. सोशल मीडियातून त्यासाठी 850 जणांनी मोफत नोंदणी केली आहे. त्र्यंबकेश्‍वरच्या गुरुपीठच्या माध्यमातून सामुदायिक विवाहाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री अन्‌ केंद्रीयमंत्र्यांची उपस्थिती 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी रामकुंड ते महोत्सव स्थळापर्यंत कृषीदिंडी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी दहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेही महोत्सवाला उपस्थित राहतील, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, की डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीनिमित्त संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या सन्मानाबरोबर त्यांच्या संशोधनासाठी मोफत स्टॉल देण्यात येतील.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 26 एप्रिलला सकाळी दहाला शेतकरी वधू-वर परिचय मेळावा होत आहे.  विनामूल्य सर्व जाती-धर्माच्या वधू-वरांना नोंदणी करता येईल.दुपारी दोनला देशी बियाणे या विषयावर चर्चासत्र होईल. भविष्यात देशातील शेतकरी बियाण्यांच्या बाबतीत स्वावलंबी व्हावेत म्हणून गावोगाव "शाकंभरी सीड बॅंक' स्थापन करण्याचा मानस आहे. 

ग्रामअभियान पोहचवण्याचा प्रयत्न 
ग्रामअभियान संकल्पना जनतेपर्यंत पोचावी म्हणून सरपंच-ग्रामसेवक मांदियाळी 29 एप्रिलला दुपारी दोनला होईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या जोडीलाच आदर्शगाव बनवणाऱ्या सरपंच, ग्रामसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषी महोत्सवातील सहभागी कंपन्यांच्या सी. एस. आर. मधून गावाच्या विकासाला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

महोत्सवातील कार्यक्रम 
0 25 एप्रिल ः दुपारी दोन- नैसर्गिक शेतीतून शाश्‍वत समृद्धी चर्चासत्र, सायंकाळी सहा- कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधन 
0 26 एप्रिल ः सायंकाळी सहा- कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधन 
0 27 एप्रिल ः सकाळी दहा- पर्यावरण प्रकृती व दुर्ग संवर्धन कार्यशाळा, दुपारी दोन- दुग्ध व्यवसाय चर्चासत्र, सायंकाळी सहा- समाज प्रबोधन 
0 28 एप्रिल ः सकाळी दहा- उद्योजक व व्यावसायिक स्नेहसंमेलन, दुपारी दोन- कृषी प्रक्रिया उद्योग व जोड व्यवसाय संधी चर्चासत्र, सायंकाळी सहा- समाज प्रबोधन 
0 29 एप्रिल ः सकाळी दहा- युवा महोत्सव, सायंकाळी चार- कृषी माऊली पुरस्कार वितरण, सायंकाळी सहा- कृषी कीर्तन 
 

Web Title: marathi world agriculture exhibition