मराठवाड्याच्या उसाला पुणेरी गोडवा

ज्ञानेश्‍वर रायते
बुधवार, 26 डिसेंबर 2018

भवानीनगर - यंदाच्या हंगामात मराठवाड्यातील ऊस पश्‍चिम महाराष्ट्रात येऊ लागला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातील उसाला पुणेरी गोडवा लागला असून, पुणे जिल्ह्यातील कारखान्यात गाळप होणाऱ्या उसामुळे टनामागे ३५० ते ४०० रुपये फायदा होत असल्याने बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक त्यांचा ऊस इकडे पाठवू लागले आहेत.

भवानीनगर - यंदाच्या हंगामात मराठवाड्यातील ऊस पश्‍चिम महाराष्ट्रात येऊ लागला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातील उसाला पुणेरी गोडवा लागला असून, पुणे जिल्ह्यातील कारखान्यात गाळप होणाऱ्या उसामुळे टनामागे ३५० ते ४०० रुपये फायदा होत असल्याने बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक त्यांचा ऊस इकडे पाठवू लागले आहेत.

जिल्ह्यातील छत्रपती कारखान्यात आतापर्यंत ४० हजार टनांहून अधिक ऊस गाळप झाला आहे. हा ऊस बीड जिल्ह्याच्या विविध तालुक्‍यांमधून येत असल्याची माहिती छत्रपती कारखान्याच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील इतरही कारखान्यांकडे बीडसह इतरही जिल्ह्यातून गेटकनचा ऊस येत आहे. अर्थात, हा ऊस पुणे जिल्ह्यात गाळप होण्यामागे बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची अगतिकताही आहे आणि आपला अधिक साखर उतारा असलेला ऊस उच्च साखर उताऱ्याच्या भागात गाळप झाला, तर दोन पैसे अधिकचे मिळतील असे सूत्र यामागे आहे. हे कारणही खरेच आहे, कारण मराठवाड्याचा भाग हा कमी साखर उताऱ्याचा प्रदेश मानला जातो. त्यानुसार मराठवाड्यात ९.५० ते ९.७५ टक्के सरासरी साखर उतारा गृहीत धरला जातो.

त्याचा विचार करता सध्याच्या एफआरपीनुसार २६१३ रुपये व त्यातील तोडणी, वाहतूक खर्च वजा केला तर १८०० ते १९०० रुपये प्रतिटनी उसाला दर मिळू शकतो. मात्र पुणे, नगर जिल्ह्यांत गाळप होणाऱ्या उसामुळे प्रतिटनी ३०० ते ४०० रुपये अधिकचे मिळत असल्याने तेथील शेतकऱ्यांचा ओढा आता पश्‍चिम महाराष्ट्राकडे वाढू लागला आहे. त्यातूनच सध्या दीड-दोनशे किलोमीटरचे अंतर कापून तेथील ऊस पुणे जिल्ह्यात येत आहे.

...हे देखील एक कारण
आघाडी सरकारच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या उपोषणादरम्यान राज्याचे साखर उतारानिहाय विभागानुसार एफआरपीचा ‘तह’ झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभाग, पुणे विभाग, मराठवाडा व विदर्भ असे टप्पे पडले. त्यानुसार वेगवेगळी एफआरपी सुरू झाली. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. चांगल्या प्रतीचा ऊस पिकवला तरी साखर उताऱ्याचा प्रदेश म्हणून मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना पैसे कमी घ्यावे लागतात. तोच न्याय पुणे जिल्ह्यालाही लागू होतो. फक्त नदी ओलांडली की उसाला थोडा अधिकचा भाव सातारा जिल्ह्यात बसतो, त्याचा परिणाम आता हळूहळू पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांवरही होऊ लागला आहे.

Web Title: Marathwada Sugarcane